पुणे : पर्वती मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये मेट्रोची सुविधा मिळणार असल्याचा दावा आमदार माधुरी मिसाळ यांनी केला आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आहे तर, सातत्यपूर्ण पाठपुराव्याने खडकवासला-स्वारगेट-खराडी या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोला राज्य शासनाची मान्यता मिळविली आहे. प्रत्येक प्रभागातून मेट्रोची सेवा असणार आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार मिसाळ यांनी वाळवेकर गार्डन परिसरात आज नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी मेट्रोच्या सेवेबाबत नागरिकांना माहिती दिली. तसेच त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी माजी नगरसेवक महेश वाबळे, आनंद रिठे, प्रशांत जगताप, कैलास मोरे, प्रशांत थोपटे, रवींद्र चव्हाण, औदुंबर कांबळे, शीतल मोरे, संध्या नांदे, शिवाजी भागवत, रामदास शिंदे, रमेश कुदळे, बिपीन पोतनीस, मनोज कुदळे, विकास कांबळे, विकास पुलावळे, अनिल जाधव, गणेश सुतार उपस्थित होते.
स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी हा पुणे मेट्रोचा सुमारे ३३ किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. स्वारगेट मेट्रो स्टेशनला प्रवाशांची पहिली पसंती मिळत आहे. मेट्रोमुळे सुरक्षित, आरामदायी, किफायतशीर व जलद प्रवासाची सुविधा पुणेकरांना मिळत आहे. मेट्रोमुळे उद्योग, व्यवसाय, रोजगारांच्या संधींमध्ये वाढ होणार आहे. शहराच्या विविध भागांतील उपनगरे मेट्रो मार्गांमुळे जोडली जात आहेत. या प्रकल्पाचा पर्वती विधानसभा मतदारसंघाला मोठा फायदा होणार असल्याचे मिसाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.