पवारांच्या दौऱ्याने बालेकिल्ल्यातील कार्यकर्ते “चार्ज’

उत्स्फूर्त प्रतिसादाने युतीच्या गोटात धडकी : रविवारी साताऱ्यात तोफ धडाडणार

स्वकियांकडून आणि विरोधकांकडून एकाच वेळी रोज राजकीय वार होत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वयाच्या 80 व्या वर्षी पुन्हा एकदा राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पवारांना ज्येष्ठांसह युवक वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विशेषत: ढासळू लागलेल्या पक्षाच्या बालेकिल्ल्यातील कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कार्यकर्ते पुन्हा नव्या जोमाने तयारीला लागले असून येत्या रविवारी साताऱ्यात शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या पक्ष मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्यानंतर पवारांनी नुकताच सोलापूर व उस्मानाबाद येथे दौरा केला. तेथे पवारांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेषत: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात त्या व्हिडीओंमुळे कार्यकर्ते चार्ज होत आहेत. पवारांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नैराश्‍य पसरले होते. सुरुवातीला शिवेंद्रसिहराजे भोसले व नंतर उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदांचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने कार्यकर्त्यांना मोठा धक्‍का बसला. त्याचबरोबर ना. रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मेंदू कोमात जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर हे त्यांच्या मतदारसंघांमध्ये खिंड लढवित आहेत. मात्र, उर्वरित मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांना वालीच नसल्याची स्थिती होती. मात्र, आता पवार हे रविवार, दि. 22 रोजी साताऱ्यात येत असून कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. त्यावेळी पवार त्यांच्या खास शैलीत मागदर्शन करणार, या विचारानेच कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत. त्या दिवशी सातारा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत पवार संकेत देणार असल्यामुळे जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या नजरा साताऱ्याकडे लागल्या आहेत.

अमोल अन्‌ रोहित लढवतायत खिंड
राष्ट्रवादीकडे एका बाजूला वजाबाकी होत असली तरी दुसऱ्या बाजूला नव्याने बेरीजदेखील होत आहे. विशेषत: पक्षात नव्याने दाखल झालेले खासदार अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी हे पक्षातून गेलेल्या नेत्यांचा अनुशेष भरून काढताना दिसून येत आहेत. दोन्ही अमोल यांची भाषणे ऐकण्यासाठी होणारी गर्दी पक्षाला संजीवनी देणारी ठरू शकते. शरद पवार यांचे नातू रोहित पवार हेदेखील युवकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून त्यांचा विनयशील स्वभाव आणि मार्गदर्शन या बाबी ज्येष्ठ नागरिकांनाही प्रभावित करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here