– सचिन खोत
पुणे – इंदापूर तालुक्यातील पाटील, भरणे, माने आडनावाच्या व्यक्तींचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यामुळे तालुक्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षांतराची वादळे घोंगावत आहेत. त्यात माजी मंत्री पाटील यांची भूमिका सध्या तरी “वेट ऍन्ड वॉच’ या स्थितीत पोहोचली आहे. ते अधिकृतपणे बोलत नाहीत. त्यामुळे पाटील यांचा भाजप प्रवेश हा आघाडीच्या जागा वाटपावरच ठरणार असल्याचे दिसत आहे. तसेच आमदार भरणे यांना जागा वाटपात कॉंग्रेसचा अडसर ठरत आहे. पक्षांतरांची वादळे कोणत्या टप्प्यावर पोहोचणार, याची उत्सुकता आहे.
इंदापूर तालुक्यात लोकसभेपासून राजकीय हवा पालटली आहे. हवेचा वेग संथगतीने असताना गेल्या दहा ते बारा दिवसांत कमालीचा वेग पकडला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्यामुळे राजकीय हवेचा झोत आता वेगळाच संदेश देत आहे. लोकसभा निवडणुकीपासून आघाडीतील एकोपा लक्षात घेता आता हर्षवर्धन पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीची परतफेड विधानसभेला करण्याची अट घातली होती. त्यामुळे पाटील यांनी एकदिलाने सुळे यांना मदत केली होती. त्याची परतफेड होईल, या आशेच्या हिंदोळ्यावर पाटील हे अद्याप ठाम आहेत. परंतु राज्यासह शेजारच्या जिल्ह्यातून भाजप आणि शिवसेनेत पक्षप्रवेश सोहळे होत असताना इंदापूरमध्ये अद्याप वादळापूर्वीची शांतता दिसत आहे. मात्र, आतून राजकीय वातावरण धुमसत आहे. याची दखल आघाडीतील हायकमांडने घेतली नाही. त्यामुळे इंदापूरचा पेच कायम आहे. त्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य इंदापूरवर निशाणा साधून आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात आघाडीला पोषक वातावरण आहे. शेजारील जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सेनापती भाजप आणि शिवसेनेत दाखल होत असताना एकमेव बारामती लोकसभा मतदारसंघ अपवाद राहिला आहे. या मतदारसंघात भोर, इंदापूरवर महायुतीने लक्ष केंद्रित केले आहे. आघाडीने एकत्र काम केल्यास चार विधानसभा मतदारसंघ ताब्यात येईल, असे चित्र दिसत आहे. मात्र, आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यामुळे पाटील आणि भरणे यांच्यामध्ये उमेदवारीबाबत घालमेल सुरू झाली आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा रेटा आणि जनाधार लक्षात घेता पाटील समर्थकांनी भाजपच्या वाटेवर जाण्यासाठी धोशा लावला आहे. इंदापूरच्या जागेवरून आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री पाटील यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेस संथगतीने वाटचाल करीत आहे. यातून तोडगा काढला नाही, तर पक्षांतरांची वादळे प्रत्यक्षात घोंगावल्याशिवाय राहणार नाही.
आघाडीचा तिढा कधी सुटणार?
इंदापूरच्या जागेचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यात लोकसभेची परतफेड करा, असा सूर हर्षवर्धन पाटील यांनी आळवला आहे. त्यात ते आग्रही आहेत. लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीच्या बोलीवर पाटील यांनी सुळे यांनी मताधिक्य दिले. तरीही राष्ट्रवादीकडून जागा वाटपासाठी विलंब होत आहे. गणेशोत्सवानंतर आचारसंहिता जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात आतापासून पक्षांतराची वादळे धडकत आहेत. त्यामुळे या वादळात इंदापूरमधील पाटील आणि भरणे यांच्यापैकी कोणाचा दिवा उजळणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
पक्षांतर भाजप, की शिवसेनेत?
महायुतीच्या निवाड्याप्रमाणे इंदापूरची जागा शिवसेनेकडे आहे. हर्षवर्धन पाटील यांचे भाजप, शिवसेनेशीही सख्य आहे. त्यामुळे पाटील यांचा पक्ष प्रवेश भाजपमध्ये होणार आहे, अशी चर्चा झडत असताना शिवसेना हा मतदारसंघ जागा वाटपात भाजपला सोडणार काय, अशी चर्चा सुरू आहे. पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांसाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे आघाडीतील जागा वाटपाकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.