मुंबई – महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. रुग्णांना बेड आणि अत्यावश्यक औषधी मिळत नसल्याचं चित्र आहे. तर करोना प्रतिबंधक लशीचा पुरवठाही कमी प्रमाणात होत आहे. यावरून राजकारण तापलं असून राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमने-सामने आलं आहे. केंद्र सरकारकडून लशींचा कमी प्रमाणात पुरवठा करण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. तर केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत. pic.twitter.com/MdYDR4Ly3W
— Prithviraj Chavan (@prithvrj) April 10, 2021
यावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकावर गंभीर आरोप केले आहे. महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर करोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत’, असं ट्वीट करत पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक सोबत जोडलं आहे.
चव्हाण यांनी पोस्ट केलेल्या पत्रकात केंद्र सरकारकडून अन्य राज्यांना आणि महाराष्ट्राला देण्यात आलेली वैद्यकीय उपकरणांची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार,
प्रति 1 हजार रुग्णांमागे कोणत्या राज्यांना काय मिळालं?
- गुजरात – N95 मास्क – 9623, पीपीई किट – 4951, व्हेंटिलेटर्स – 13
- उत्तर प्रदेश – N95 मास्क – 3916, पीपीई किट – 2446, व्हेंटिलेटर्स – 7
- पश्चिम बंगाल – N95 मास्क – 3214, पीपीई किट – 848, व्हेंटिलेटर्स – 2
- तामिळनाडू – N95 मास्क – 2213, पीपीई किट – 639, व्हेंटिलेटर्स – 2
- महाराष्ट्र – N95 मास्क – 1560, पीपीई किट – 723, व्हेंटिलेटर्स – 2
- केरळ – N95 मास्क – 814, पीपीई किट – 192, व्हेंटिलेटर्स – 1