मुंबई इंडियन्सने ‘पार्थिव पटेल’वर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

गुणवत्ता शोध समितीत केला समावेश

मुंबई – भारताचा यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने ( Parthiv Patel ) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृती जाहीर केली. त्याचा निवृत्तीचा निर्णय जाहीर होऊन एक दिवसही उलटलेला नसताना त्याची मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians )आपल्या गुणवत्ता शोध समितीवर नियुक्ती केली आहे. 

आयपीएल ( IPL ) स्पर्धेसाठी संघाला कोणता खेळाडू लाभदायक ठरेल अशा खेळाडूंची नावे सुचवणे, तसेच देशातील विविध स्तरांवरील क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केलेल्या खेळाडूंमधून सर्वोत्तम खेळाडू निवडून त्यांना मुंबई संघात संधी देण्यासाठी ही समिती कार्यरत आहे.

पार्थिव 2015 ते 2017 या कालावधीमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला होता. या कालावधीमध्ये पार्थिव नेमका कसा खेळाडू आहे, हे मुंबई इंडियन्सच्या संघाला समजले होते. त्यामुळे त्यांनी आता पार्थिववर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार पार्थिव मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आता टॅलेंट स्काऊटचे (गुणवत्ता शोध प्रकल्प) काम करणार आहे. त्याचबरोबर पार्थिवला आता मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे.

आतापर्यंत आयपीएलमध्ये आपण असे बरेच खेळाडू पाहिले की त्यांना यापूर्वी कोणीही ओळखत नव्हते. पण हे खेळाडू स्थानिक पातळीवर दमदार कामगिरी करत होते. स्थानिक पातळीवर कोणते युवा खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करत आहेत आणि त्याचा आपल्या संघाला नेमका कसा फायदा होऊ शकतो, हे शोधण्याचे काम टॅलेंट स्काऊटचे असते.

टॅलेंट स्काऊट युवा प्रतिभा शोधून संघाच्या प्रशिक्षकांपुढे सादर करत असतो. त्यानंतर या युवा खेळाडूंना निवडले जाते आणि त्यानंतरच त्यांचा संघात समावेश केला जातो. भविष्यात जर एखाद्या संघाला राखीव फळी जर चांगली बनवायची असेल तर त्यासाठी टॅलेंट स्काऊटची भूमिका महत्वाची ठरत असते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.