पार्थ पवार, श्रीरंग बारणेंचा अर्ज दाखल

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरावयाच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार पवार युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार रॅली काढून शक्‍तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

पार्थ यांच्या रॅलीत पार्थ यांचे वडील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाऊ जय पवार आदी रॅलीत सहभागी झाले होते. तर बारणे यांच्यासोबत अर्ज दाखल करताना युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे, मंत्री गिरीश महाजन, विजय शिवतारे यांच्यासह आमदार लक्ष्मण जगताप, नीलम गोऱ्हे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर, पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, मावळचे आमदार बाळा भेगडे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.

लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. अर्ज दाखल करण्यापूर्वी पार्थ पवार यांनी पिंपरीतील एच.ए कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज, पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, मोरवाडी येथे अहिल्यादेवी होळकर, निगडीत अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. चिंचवड येथे क्रांतिकारक चापेकर बंधू यांच्या स्मारकास अभिवादन केले. त्यानंतर वाल्हेकरवाडी येथून रॅली काढण्यात आली.

यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुण्याचे अंकुश काकडे आदी रॅलीत सहभागी झाले होते. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सातव्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात पार्थ पवार यांनी अर्ज दाखल केला. पवार यांचा अर्ज दाखल करताना आमदार सुरेश लाड, शेकापचे आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मीनाक्षी पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे उपस्थित होते. पार्थ यांच्या आई सुनेत्रा पवार, माजी मंत्री मदन बाफना उपस्थित होते.

तर शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर आकुर्डी येथील श्री खंडोबारायाचे दर्शन घेतल्यानंतर रॅली सुरू झाली. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा ध्यास घेऊन महायुतीने जोरदार शक्‍तीप्रदर्शन केले. रॅलीमध्ये शिवसेना-भाजपाच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह आरपीआयएच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप नेत्या उमा खापरे, अमित गोरखे आदी उपस्थित होते. दुपारी एकच्या सुमारास रॅली प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता निगडी येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सातव्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.