पार्थ पवारांची ‘वाऱ्यावर स्वारी’

‘व्हीआयपी’ प्रचार यंत्रणा : कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

पिंपरी – मतांचा जोगवा मागण्यासाठी निवडणूक उमेदवार नको त्या उठाठेवी करत असताना मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा गाडा “व्हीआयपी’ पद्धतीने हाकला जात असल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. “ते आले आणि गेले’ अशा पद्धतीने भेटीगाठी सुरू असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नाराजीचा सूर आळवला जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळच्या निवडणूक रिंगणात उतरल्याने हा लोकसभा मतदार संघ चर्चेत आला आहे. जुन्यांना डावलून नवख्या पार्थ पवार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली. थेट अजित पवार यांचे चिरंजीव रिंगणात आले. त्यातच विधानसभा निवडणुकीची उमेदवारी धोक्‍यात येईल या भीतीने जुन्या पदाधिकाऱ्यांनी “सतरंज्या उचलण्या’चे धोरण ठेवले आहे.

“हातचे राखून’ ते प्रचार यंत्रणेत सक्रीय दिसत आहेत. दुसरीकडे पार्थ पवार यांनी भेटीगाठी, प्रचार फेऱ्यांवर भर दिला आहे. मात्र, पार्थ पवार स्वतः मोजकेच बोलतात. उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी अनेक फंडे राबवत असताना पार्थ पवार मात्र, काही अंतरावरुनच मतदारांशी संवाद साधत आहेत. प्रचार फेरीतील वाहनांमधून खाली उतरण्याचे नाव ते घेत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी हतबल झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी आकुर्डीतील प्रचार फेरी दरम्यान, एका शिवसेना नगरसेवकाच्या भेटीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांना आग्रह केला. पार्थ पवारांची स्वारी या नगरसेवकाच्या घरासमोर आल्यानंतर पार्थ पवार यांना त्यांच्या घरात येण्यासाठी आग्रह करण्यात आला. मात्र, “मी आत जाणार नाही, त्यांना बाहेर बोलवा’, असे फर्मान पार्थ यांनी सोडले. पार्थ यांची ही भूमिका पाहून त्या नगरसेवकानेही मानपानाचा राग आळवला.

अखेर पार्थ त्यांची भेट न घेताच पुढे निघून गेले. त्यामुळे या भेटीसाठी आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. पार्थ यांच्या प्रचारासाठी त्यांच्या मातोश्री सुनेत्रा यांच्यासह सर्व कुटुंब मावळामध्ये पायाला भिंगरी लावून फिरत आहे. पार्थ यांनाही सर्वपक्षीय जुन्या कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेण्यासाठी अजित पवार यांनी बजावले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अजित पवार याबाबतचा दररोज आढावा घेत आहेत. मात्र, पार्थ प्रचार यंत्रणेत “सेलिब्रेटी’सारखे वावरत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची गोची झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.