मराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार मैदानात

सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार हस्तक्षेप याचिका

मुंबई – मराठा आरक्षणासाठी बीड येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे आता मैदानात उतरले आहेत. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविण्यात अपयश आल्याची टीका राज्य सरकारवर होत असतानाच पार्थ यांनी ही भूमिका घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

पार्थ पवार यांनी विवेक रहाडेचा फोटो ट्‌विटरवर पोस्ट करून हे ट्‌विट केले आहे. विवेकने आमच्या मनात पेटवलेली संघर्षाची ज्योत संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करू शकते. संपूर्ण मराठा तरुणांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. त्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही, असे पार्थ यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

लाखो असहाय विवेकला न्याय मिळावा म्हणून माझ्या मनातील मराठा आरक्षणाची पेटलेली मशाल पुढे नेण्यास मी तयार आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचे ऐकून हादरून गेलो. अशा घटना घडण्याआधीच मराठा नेत्यांनी जाग व्हावे आणि आरक्षणासाठी लढायला हवे. महाराष्ट्र सरकारनेही यात तातडीने लक्ष घातले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. शिवाय अर्थ खात्यापासून ते गृहखात्यापर्यंतची महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. असे असताना पार्थ यांनी हे ट्‌विट करून राज्य सरकारला एक प्रकारे घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात असून पार्थ यांच्या या ट्‌विटमुळे राज्य सरकारही कोंडीत सापडले असल्याची चर्चा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.