पुणे : अवघ्या पाच दिवसांपूर्वी डेक्कन क्वीन ट्रेनचे नवे डबे प्रवाशांच्या सेवेत आले आहेत. पण, यापैकी वातानुकूलित सी-2 बोगीतील शौचालयाच्या छताचा काही भाग सोमवारी कोसळला. यात कोणालाही इजा झाली नसली, तरी या दुर्घटनेमुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या मेंन्टनन्स विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
मुंबई-पुणे शहरांना जोडणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ही 22 जूनपासून नव्या स्वरूपात धावत आहे.डेक्कन क्वीनचे पारंपरिक डबे जाऊन तिला “एलएचबी’ म्हणजे “लिंक हॉफमन बश्च’ या जर्मन तंत्रज्ञानावर आधारित वातानुकूलित डबे बसवण्यात आले आहेत.माझगाव डॉक येथे या डब्यांची तपासणी करून ते प्रवासासाठी योग्य असल्याने मान्यताही दिली. त्यानंतरच 22 जून पासून प्रवाशांच्या सेवेत हे डब्बे जोडण्यात आले. सोमवारी नेहमीप्रमाणे ही ट्रेन सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. पण, प्रवासादरम्यान शौचालयच्या छताचा काही भाग खाली कोसळला.
‘शौचालयाच्या छताचा काही भाग कोसळला. पण, यात कोणालाही इजा झाली नाही. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत लगेचच मुंबईत रेल्वे पोहचल्यानंतर याची दुरुस्ती केली आहे.’
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग
‘रेल्वे विभागाचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतणारा आहे. जर “एलएचबी’ कोच सुरक्षित नसतील, तर प्रशासनाने मुंबई-पुणे प्रवासासाठी “वंदे भारत’ ट्रेन पुणेकरांसाठी द्यावी.’
– हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप