भाग-२: श्रीगणेश बनवा शाडूचा… संदेश पर्यावरण रक्षणाचा

शिल्पकार प्रमोद कांबळे : दै. प्रभात ग्रीन गणेशा-2019 चे प्रात्यक्षिक

पुणे: मातीपासून स्वत:च्या हाताने मूर्ती घडवायची आणि तिची स्थापना करून त्याची मनोभावे पूजा करायची हीच आपली खरी परंपरा आहे. अशा मूर्तीमुळे पर्यावरण तर सुरक्षित राहतेच शिवाय आपल्या मूळ परंपरेचे योग्य अर्थाने वहन होते. त्यामुळेच नागरिकांनी आगामी गणेशोत्सवात मातीच्या मूर्ती स्वत: घडवून, पर्यावरण संवर्धनास हातभार लावला पाहिजे,’ असा संदेश शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी “प्रभात’च्या माध्यमातून दिला.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी “प्रभात’तर्फे यंदा माणिकचंद उद्योग समूहाच्या सहकार्याने “ग्रीन गणेशा-2019′ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी बांधकाम व्यवसायातील अग्रणी सिद्धिविनायक ग्रुप, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील पॉस्को एन्व्हायर्मेंटल सोल्युशन्स, तसेच श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पुणे महानगरपालिका यांचे सहकार्य लाभले आहे.

या उपक्रमांतर्गत शाडूच्या मातीची मूर्ती कशी तयार करावी, याबाबत सर्वसामान्य नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांना शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्यासह तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याव्यतिरिक्त कांबळे यांनी अतिशय कमी वेळेत, मोजक्‍या साहित्यांचा वापर करुन श्रीगणेशाची सुबक मूर्ती कशी तयार करावी याचे प्रात्यक्षिक दिले. कांबळे म्हणाले, स्वत:च्या हाताने घडवलेली मूर्ती ही केवळ मूर्ती न राहता, तिच्यासोबत एक भावनिक बंध तयार होतात. ज्यावेळी तुमची एखाद्या वस्तूसोबत भावनिक जोड निर्माण होते, त्याचवेळी खऱ्या अर्थाने तुमच्यामधील श्रद्धा, आस्था जागृत होते. इतकेच नव्हे तर शाडूच्या मातीपासून बनवलेली गणेशमूर्ती ही पर्यावरणासाठी अतिशय उपयुक्त ठरते. याद्वारे तुम्हाला हवी तशी मूर्ती घडवता येते. त्याची आवडीनुसार सजावट, रंगरंगोटी करता येते, पाण्यात पटकन विरघळणारी शाडू माती खऱ्या अर्थाने विसर्जित होते आणि या मूर्तीच्या मातीचा पुनर्वापरदेखील शक्‍य आहे. असे एक ना अनेक फायदे या शाडूच्या मातीच्या मूर्तीपासून होतात. त्यामुळेच प्रत्येक नागरिकाने शाडू मातीची मूर्ती बनविणे आणि तिचा वापर करणे याला प्राधान्य दिले पाहिजे.


शाडूच्या मूर्तीसाठी लागणारे साहित्य

  • शाडूची माती
  • एक कॉटनचा रूमाल
  • थोडेसे पाणी
  • आईस्क्रीमची काडी

Leave A Reply

Your email address will not be published.