गोंदिया : नागालँड बार्डवर मंगळवारी (दि.२५) सकाळी झालेल्या चकमकी दरम्यान गोळी लागून गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील सीआरपीएफचे जवान प्रमोद कापगते हे शहीद झाले. त्यांची सेवा समाप्त होण्यासाठी केवळ १५ दिवस बाकी होते.
प्रमोद कापगते यांचा मृतदेह गुरुवारी त्यांच्या मुळगावी परसोडी येथे आणण्यात येणार असून तेथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. प्रमोद यांच्या मृत्यूने गोंदिया जिल्ह्यावर शोककळा पसरली.
भाजपचे जेष्ठ नेते विनायक कापगते यांचे ते सुपत्र होत. पदवीच्या अंतिम वर्षात असताना प्रमोद २००१ मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण परसोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण सडक अर्जुनी येथील राजीव गांधी महाविद्यालयात पूर्ण झाले. मागील २० वर्षापासून ते सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. सीआरपीएफमधील त्यांचा २० वर्षांचा करार १५ दिवसांनी समाप्त होणार होता.
मंगळावारी नागालँड बॉर्डरवर झालेल्या चकमकीदरम्यान त्यांना गोळी लागली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी वंदना कापगते, मुलगा कुणाल, भाऊ राजेश असा मोठा परिवार आहे.