राजगुरूनगर (प्रतिनिधी) – पोलिसांचा पोशाख परिधान करून खेड पोलीस ठाण्याच्या निरीक्षकालाच “दारू कोठे लपवून’ ठेवली आहे, असे विचारणाऱ्या तोतया पोलिसाची तोतयागिरी उघड झाल्याने या भामट्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
जयदीप नवीनकुमार शहा (वय 20 रा. मूळ गाव अकोले, जि. अहमदनगर, सध्या रा. चाकण. ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. तर पोलीस हवालदार कोमल तोताराम सोनुने यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खेड पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी हे मित्राबरोबर गुळाणी घाट येथे फिरायला गेले होते. रस्त्यालगत झाडाखाली बसून भेळ खात असताना जयदीप नवीनकुमार शहा हा तोतया पोलीस व त्याचा मित्र हे दोघे जण गुळाणीवरून दुचाकीवरून येत होते.
दुचाकी थांबवून चौधरी व मित्रांना तोतया पोलिसाने विचारले, तुम्ही इथे काय करता, दारू पिता आहे काय, दारू कुठे लपवून ठेवली ते सांगा. यावेळी या तोतयाने वाहतूक पोलिसंचा पोशाख परिधान केला असल्याने चौधरी यांनी त्याला कोणत्या पोलीस ठाण्यात काम करतो, असे विचारले. त्यावर त्याने सांगितले मी चाकण येथे काम करीत आहे. दरम्यान, चौधरी यांच्या मित्रांनी त्या तोतयाला सांगितले की, हे खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक चौधरी आहेत. त्यांना ओळखत नाही का? त्यावर तोतया पोलिसाने साहेब तुम्ही पण का असे म्हणून एक सॅल्युट मारून तेथून पळ काढला.
चौधरी यांना तो तोतया पोलीस असल्याची शंका आल्याने त्यांनी खेड पोलीस ठाण्यात फोन करून याबाबत माहिती दिली. तत्काळ पोलीस हवालदार तान्हाजी हगवणे, संतोष मोरे, कोमल सोनुमे यांनी सापळा रचून राक्षेवाडी येथील गणपती मंदिरासमोर दुचाकीवर येत असताना तोतया
पोलिसाला ताब्यात घेतले. पोलिसीखाक्या दाखवत कसून चौकशी केली असता तोतयागिरी करीत असल्याचे त्याने सांगितले.
आरोपी भोसरीतील रिक्षाचालक
शहा हा चाकण ते भोसरी येथे रिक्षा चालविण्याचे काम करतो तो पोलिसांचा फॅन असल्याचे सांगतो. त्याने पुणे येथून वाहतूक पोलिसाचा गणवेश शिवून घेतला होता. तो परिधान करत फिरत होता. गणवेशावर लावलेली नेमप्लेट सापडली असल्याचे सांगितले. यापूर्वी चाकण परिसरात येथेही दोन रिक्षाचालकांना जास्त प्रवांशी भरता म्हणून त्यांना गुन्हे दाखल करण्यांची धमकी देऊन प्रत्येकी दोनशे रुपये उकळले होते.