सातारा – काही दिवसांपूर्वीच साताऱ्यात आयडीबीआय बॅंकेचे एटीएम फोडून 11 लाख रुपये लंपास झाले असतानाची घटना ताजी असतानाच रात्री साडेअकराच्या सुमारास कोडोली सातारा येथील ऍक्सिस बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनप्रित फुल्लासिंग (वय 22, रा. शहाजापूर, जि. पटियाला, पंजाब) यास एटीएम गाळामालकासह त्याच्या सहकाऱ्यांनी पकडून ठेवत पोलिसांच्या ताब्यात दिले.
अधिक माहिती अशी, सातारा ते रहिमतपूर रस्त्यावर कोडोली येथे असलेले ऍक्सिस बॅंकेच्या एटीएम परिसरात गाळामालक राम शंकर काटे जेवणानंतर शतपावली करत होते. त्यावेळी त्यांना एटीएममध्ये काहीतरी वेगळे घडत असल्याचा संशय आला. त्यांनी याबाबत ऍक्सिस बॅंकेच्या सुत्रांशी संपर्क साधला असता. बॅंकेने ऑनलाईन सीसीटीव्ही सिस्टिममध्ये एक चोरटा मशीन फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. बॅंकेच्या सूत्रांनी काटे यांना याबाबत कळवल्यानंतर काटेंनी आपल्या सहकाऱ्यासमवेत धाडसाने एटीएममध्ये जात चोरट्याला पकडून ठेवले.
हा चोरटा एटीएम रुममध्ये प्रवेश करुन दगडाने मशीन फोडण्याचा करत होता. यावेळी चोरट्याने रुममधील बॅटरी बॅकअप रुमचा दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
याबाबत एटीएमचे गाळामालक राम शंकर काटे (वय 43, रा. गणेश चौक कोडोली) यांनी शहर पोलिसांना ही घटना सांगताच पोलिसांनी पीसीआर पेट्रोलिंगची गाडी तातडीने रवाना केली. पोलिसांनी चोरट्यास ताब्यात घेवून त्याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली असल्याचे या गुन्ह्याचे तपास करणारे हवालदार जी. एम. जाधव यांनी
सांगितले.