नवी दिल्ली – संरक्षण विभागाशी संबंधीत संसदीय सल्लागार समितीने पुर्व लडाखला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या भागातील गलवान खोरे, पॅंगाग तलाव या परिसरालाही भेट देण्याची इच्छा या समितीने सरकारकडे व्यक्त केली आहे. तथापि हा भाग संवेदनशील असल्याने तेथे जाण्यासाठी या समितीला सरकारची अनुमती घ्यावी लागणार आहे.
ही संसदीय सल्लागार समिती तीस जणांची असून माजी केंद्रीय मंत्री ज्युएल ओराम हे या समितीचे अध्यक्षही आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी या समितीचे सदस्य आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही समिती त्या भागाला भेट देण्यास जाणार आहे. या समितीच्या अलिकडेच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भारत आणि चीन या दोन्ही देशांतील प्रत्यक्ष ताबा रेषवरही जाण्याचा मनोदय समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.पुर्व लडाख मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे पण तेथील लष्कर मागे घेण्याबाबत नुकताच समझौता झाला आहे असे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी नुकसेच संसदेत घोषित केले आहे.
या समझौत्यानुसार चीन फिंगर पाइॅन्ट 8 पर्यंत आपले लष्कर मागे घेणार आहे. पण आत्तापर्यंत फिंगर पाईन्ट आठ हा भागही भारतीय हद्दीतच होता. पण आता त्या भागात चीनचे सैन्य ठेवण्यास भारताने अनुमती दिली आहे याचा अर्थ तो भूभाग चीनला देण्यात आला आहे हे सिद्ध होते असे असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कालच पत्रकार परिषदेत केला आहे.