नवी दिल्ली – लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाचे कामकाज सोमवार, दि. 20 एप्रिलपासून सुरू झाले आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सचिवालयांचे कामकाज बंद करण्यात आले होते. तसेच लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज 24 मार्चपासून अनिश्चित काळापर्यंत स्थगित करण्यात आले होते.
लोकसभेत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 एप्रिल रोजी समाप्त होणार होते. परंतु, निर्धारित वेळेपूर्वीच हे कामकाज स्थगित करण्यात आले होते. लोकसभा सचिवालयाच्या अधिकृत आदेशानुसार, सोमवारपासून दोन्ही कार्यालयांत काम सुरू करण्यात आले असून संयुक्त सचिव स्तरावर आणि त्यांच्या वरचे अधिकारी कार्यालयातातून काम हाताळणार आहेत.
याशिवाय इतर अधिकारी आळीपाळीने काम करतील. कार्यालयातून काम करताना सचिवालयाचे कर्मचारी सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करीत आहेत. ई-कार्यालयात फाइल इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच धाडली जाईल. अपवाद केवळ लोकसभा अध्यक्षांच्या विचारार्थ अत्यावश्यक फाइल्सचा असेल, असे मुख्य सचिवांनी सांगितले आहे.