Parliament House । संसदेच्या संकुलात असणारे महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी यांचे पुतळे हटवण्यात आले आहेत. दरम्यान, या पुतळ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून दुसरीकडे बसवण्यावरून राजकारण आता तीव्र झाले आहे. या निर्णयावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या निर्णयाला अयोग्य पाऊल म्हटले आहे.
संसदेतील पुतळे का हटवले गेले याविषयीचे आता स्पष्टीकरण लोकसभा सचिवालयाने दिले आहे. लोकसभा सचिवालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “नवीन संसद भवन बांधल्यानंतर, संसद संकुलाच्या सुशोभीकरणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. संसद परिसराच्या विविध भागात देशातील महान नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांचे पुतळे बसवण्यात आले. संसदेच्या संकुलात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे स्थान असल्याने या पुतळ्यांना पाहण्यासाठी पर्यटकांना अडचणी येत होत्या. यासाठीच या सर्व पुतळ्यांची प्रतिष्ठापना संसद भवन संकुलातच प्रेरणास्थान असलेल्या भव्य ठिकाणी करण्यात येत आहे.
लोकसभा सचिवालयाने केले निवेदन जारी
लोकसभा सचिवालय, हे प्रेरणास्थान अशा प्रकारे विकसित केले जात आहे की संसद संकुलात येणारे पर्यटक या महान नेत्यांचे पुतळे सहज पाहू शकतील आणि त्यांच्या जीवनातून आणि तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेऊ शकतील.’ असे म्हटले.
संसदेचे संकुल बदललेले दिसेल Parliament House ।
जुने संसद भवन आणि संसदेचे ग्रंथालय यांच्यामध्ये असलेल्या लॉनमध्ये आदिवासी नेते बिरसा मुंडा आणि महाराणा प्रताप यांचे पुतळेही बसवण्यात आले आहेत. आता सर्व पुतळे एकाच ठिकाणी आहेत. या महिन्यात 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू होईल तेव्हा संसदेचे संकुल नव्या रूपात दिसणार आहे. संसदेच्या आतील चार इमारतींच्या एकत्रीकरणाचे काम सुरू आहे. बाहेरील भागाच्या पुनर्विकासाचा एक भाग म्हणून, महात्मा गांधी, शिवाजी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळे जुन्या संसद भवनाच्या गेट क्रमांक 5 जवळील लॉनमध्ये स्थलांतरित करण्याची योजना आहे, ज्याला विधान सदन असे नाव देण्यात आले आहे.
काँग्रेसने उपस्थित केला होता प्रश्न Parliament House ।
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवर लिहिले की, “संसदेच्या सभागृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे अलीकडेच हटवण्यात आले आहेत, हे अन्यायकारक आहे.” जेव्हा महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपला मतदान केले नाही तेव्हा संसदेतील शिवाजी आणि आंबेडकरांचे पुतळे त्यांच्या मूळ जागेवरून हटवण्यात आले.