पुणे/मार्केट यार्ड, दि. 29 (प्रतिनिधी) -देशातील कोणतेही राज्य असो की शहर, उपनगर तेथील ग्राहकांना “पारले-जी’ बिस्किट माहित नाही, असा एकही जण सापडणार नाही. मजूर असो की कंपनीचा मालक हे सर्वच जण “पारले-जी’चे ग्राहक आहेत. काळाजी गरज ओळखत कंपनीने या बिस्किटा व्यतिरिक्त अन्य अनेक उत्पादन बाजारपेठेत आणली आहेत. याच कारणातून “पारले’ हा ब्रॅंड गेली 10 वर्षं सलग टॉपवरच राहिला आहे. 2021-22 मध्येही “पारले’ हा देशातील वेगाने वाढणारा “कंझ्युमर प्रॉडक्ट’ ठरला आहे. “कांतार इंडिया’च्या “ब्रॅंड फुटप्रिंट रिपोर्ट’मध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
“कंझ्युमर रीच पॉईंट’ म्हणजेच सीआरपीच्या आधारावर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. ग्राहकांनी केलेली खरेदी आणि एका कॅलेंडर वर्षात या खरेदीदारांची फ्रीक्वेंसी किती राहिली, या आधारावर सीआरपी ठरवला जातो.
कांतारच्या ब्रॅंड फुटप्रिंट रॅंकिंगचं हे 10वे वर्ष आहे. “पारले’चा यंदाचा सीआरपी स्कोअर 6 हजार 531 मिलियन आहे. या स्कोअरसह पारले सलग 10व्या वर्षी टॉपवर असल्याचे अहवालात म्हटले आहे.
लॉकडाऊननंतर सीआरपीमध्ये वाढ
लॉकडाऊन कालावधी संपल्यामुळे जवळपास सर्व ब्रॅंडच्या सीआरपीमध्ये मोठी वाढ झाली आहे. “पारले’च्या सीआरपीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 14 टक्के वाढ झाली आहे. “अमूल’च्या सीआरपीमध्ये 9 तर ब्रिटानियात 14 टक्के वाढ झाली आहे.
याशिवाय स्नॅकिंग ब्रॅंडमध्ये बालाजी (49 टक्के), कुरकुरे (45 टक्के), बिंगो (37 टक्के) यांचा समावेश आहे. बेव्हरेज ब्रॅंडमध्ये नेसकॅफेच्या सीआरपीमध्ये 19 टक्के तर बूस्टच्या सीआरपीमध्ये 15 टक्के वाढ झाली आहे.
पारले-जी बिस्किटाची मागणी सातत्याने वाढतच असते. ती कधीही कमी झालेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बिस्किटाची चव. ती किचिंतही बदललेली नाही, सर्वसामान्यांचे बिस्कीट म्हणून या बिस्किटाची ओळख आहे. अनेकवेळा अगदी जेवणाला पर्याय म्हणूनही या बिस्किटावर वेळ मारून नेली जाते. प्रवासात जास्त उपयोगी पडते. किंमतही अगदी रास्त आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बिस्कीट म्हणून पारले-जीची ओळख आहे.- विजय शिंगवी,होलसेल व्यापारी, मार्केट यार्ड, पुणे
अमूल क्र. 2 वर तर हल्दिराम टॉप 25 मध्ये
“पारले’नंतर अमूल, ब्रिटानिया, क्लिनिक प्लस आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचा समावेश आहे. पॅकेज्ड फूड ब्रॅंड हल्दिराम देखील या वर्षी बिलियन सीआरपीमध्ये सहभागी झाला. 24वा क्रमांक मिळवत हल्दिराम या ब्रॅंडने टॉप 25 मध्ये स्थान मिळवले आहे.