बालक तसेच ज्येष्ठांना बागेची दारे बंदच
पुणे – शहरातील उद्याने अखेर नागरिकांना व्यायामासाठी पुन्हा खुली होणार आहेत. दि. 1 नोव्हेंबरपासून सकाळी सहा ते आठ आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेत उद्याने सुरू करण्यासाठीचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरूवारी काढले. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर उद्याने सुरू करतानाच, उद्यानांमध्ये दिवाळीत होणारे दिवाळी पहाट तसेच इतर सांस्कृतीक कार्यक्रमांना बंदी असून सामुहिक स्वरूपात उद्यानांमधील हास्य क्लब, योगा वर्ग इतर सामुदायिक कार्यक्रम तसेच चित्रीकरणासही बंदी असणार आहे. 10 वर्षाखालील मुले तसेच 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच उद्यानात प्रवेशास बंदी असणार आहे.
महापालिकेकडून अनलॉक दोन मध्ये शहरातील उद्याने जुलै महिन्यात नागरिकांसाठी खुली करण्यात आली होती. मात्र, महापालिका प्रशासनाच्या या निर्णयास महापौरांनी स्वत: विरोध करत ती पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर आता पुन्हा तीन महिन्यांनी महापालिका प्रशासनाने पुन्हा उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना व्यायामासाठी उद्याने सुरू होणार असली तरी, त्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. तसेच उद्यानातील खेळणी आणि बाकडांवर बसण्यासही नागरिकांना मनाई असणार आहे.
दिवाळी पहाट, सांस्कृतिक कार्यक्रम नाहीच…
सर्व उद्याने दिवाळीच्या तोंडावर सुरू होणार असली तरी करोनाचा धोका लक्षात या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली आहे तसेच दरवर्षी दिवाळी पाडव्याला सारसबागेत मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करतात. मात्र, यंदा इथेही नागरिकांना मनाई असणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.