बारामती (प्रतिनिधी) – शहरातील सिनेमा रस्त्यावरील दुचाकींच्या पार्किंगचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सोडविला जाईल. तोपर्यंत या रस्त्यावर कारवाई थांबविण्याचा निर्णय प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये सोमवारी (दि. 22) झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
शहरातील वाहतूक आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे, असे असले तरीदेखील सिनेमा रस्त्याबाबत आराखड्यात संभ्रमावस्था आहे. तरीही पोलिसांनी रविवारी (दि. 21) शहरातील बेकायदा पार्किंग व कारवाई करण्यास सुरुवात केली होती. तर दुचाकी रस्त्याच्या बाजूला पार्क करून दिले नाही तर व्यवसाय अडचणीत येतील, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली तरी पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने व्यापारी व पोलीस प्रशासन यांच्यात खडाजंगी झाली. तर त्यावेळी गटनेते सचिन सातव यांनी मध्यस्थी करून यावर चर्चेतून मार्ग काढण्याची ग्वाही दिली होती.
त्यानुसार सोमवारी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे , गटनेते सचिन सातव, नगरसेवक संजय संघवी, विरोधी नगरसेवक सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. याप्रसंगी मुख्याधिकारी योगेश कडूसकर, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे तसेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र गुजराती जवहार वाघोलीकर आदींसह व्यापारी या बैठकीस उपस्थित होते. सिनेमा रस्त्यावर बेकायदेशीर लावण्यात येणाऱ्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यास आमची कोणतीही हरकत नाही; मात्र या रस्त्याच्या बाजूला लागलेल्या दुचाकीवर कारवाई करू नये. कारवाई केल्यास व्यवसाय अडचणीत येतील असे मत व्यापारी संघटनेच्या वतीने मांडले. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निवेदन देणार असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शहरातील सिनेमा रस्त्याबाबत संभ्रमावस्था दिसून येत आहे. चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात यावी याबाबत व्यापारी सहमत आहेत. मात्र, दुचाकीवर कारवाई करू नये असे त्यांचे म्हणणे आहे. आता उपमुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून प्रश्न सोडविण्यात येणार आहे. दरम्यान, शहरातील इतर ठिकाणी कारवाई सत्र सुरू आहे. मात्र, जिथे अडचणी निर्माण होतील तिथे सामोपचाराने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे.
– सचिन सातव, गटनेते, बारामती नगरपरिषद