Paris Seine River – वाढत्या शहरीकरण व औद्योगिकरणामुळे निर्माण झालेल्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे प्रदूषण. कोणत्याही शहरास भेट दिल्यानंतर तिथल्या नदीची अवस्था पाहून प्रदूषणाची समस्या किती गंभीर आहे हे लगेच लक्षात येईल. नद्यांना मातेचा दर्जा देणाऱ्या आपल्या देशातील नद्यांची अवस्था तर ‘विचारायला नको’ अशीच आहे. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास नद्यांची अवस्था सुधारू शकते याचं अनुकरणीय उदाहरण नुकतचं पॅरिसने जगासमोर ठेवलं आहे.
पॅरिसच्या सीन नदीमध्ये महापौरांची डुबकी | Paris Seine River –
फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांपुर्वी महापौरांनी सीन नदीमध्ये घेतलेली डुबकी ही नदीचं पाणी स्वच्छ असल्याचा निर्वाळा करणारी ठरली आहे. यावेळी महापौरांसोबत त्यांचे सर्व सहकारी व माजी ऑलिम्पिक खेळाडूंनीही सीन नदीमध्ये पोहण्याचा आनंद लुटला.
ऑलिम्पिक स्पर्धांमुळे नदी स्वच्छता मोहिमेस गती | Paris Seine River –
ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद यंदा फ्रान्सकडे आहे. ट्रायथलॉन आणि लांब-अंतराचे जलतरण इव्हेंट सीन नदीमध्ये घेण्यात आल्याची घोषणा ऑलिम्पिक आयोजकांनी केल्यानंतर नदी स्वच्छता मोहिमेस गती मिळाली. २६ जुलैपूर्वी नदी स्वच्छ असायला हवी अशा ऑलिम्पिक आयोजकांच्या सूचना असल्याने आम्ही हे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच हे काम केल्याचं पॅरिसच्या विद्यमान महापौर ॲन हिडाल्गो यांनी सांगितलं. नदी स्वच्छतेसाठी फ्रांस सरकारने आतापर्यंत १.५ अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड खर्च केला आहे.
सीन नदी स्वच्छ झाल्याने शहरवासीयांना पोहण्याचा आनंद घेता येणार
२०२४ ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष टोनी एस्टँग्युएट यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. सीन नदीची स्वच्छता ऑलिम्पिकहून अधिक महत्वाची आहे. पॅरिस शहराचा कायापालट करण्यासाठी, लोकांना नदीमध्ये पोहण्याची संधी मिळावी यासाठी खेळाचा वापर होणं हे खूप अर्थपूर्ण असल्याचं देखील ते म्हणाले.
३० वर्षांहून अधिक काळ प्रयत्न | Paris Seine River –
सीन नदी स्वच्छतेचा प्रकल्प सर्वात प्रथम १९९०मध्ये हाती घेण्यात आला होता. तेव्हाचे पॅरिसचे महापौर व फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक यांनी सीन नदी स्वछ करण्याचं आश्वासन दिलं होतं. सीन नदी स्वच्छ झाल्यानंतर नदीमध्ये पोहण्याचं त्यांचं स्वप्न होतं. मात्र त्यांना ते आश्वासन पूर्ण करता आले नाही आणि त्यांचं स्वप्न स्वप्नचं राहून गेलं. अशातच आता तब्बल ३० वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धांच्या निमित्ताने पॅरिसच्या एका महापौरानेच त्यांचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे.
आपल्या नद्यांच्या स्वच्छतेचं काय?
नद्यांना मातेचा दर्जा देणाऱ्या आपल्या देशातील नद्यांची अवस्था अत्यंत दयनीय अशीच आहे. निवडणूक काळातील नदी स्वच्छतेच्या वल्गना नंतर हवेतचं विरतात असेच चित्र आतापर्यंत पाहायला मिळत आले आहे.