Paris Olympics 2024 Closing Ceremony : भारतीय हॉकी संघाचा दिग्गज गोलरक्षक पीआर श्रीजेश पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात मनू भाकरसह भारताचा ध्वजवाहक असेल. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने शुक्रवारी याची घोषणा केली.
आयओए (IOA) ने एका निवेदनात म्हटले आहे की, ” पॅरिस 2024 ऑलिम्पिक खेळांच्या समारोप समारंभात पिस्तूल नेमबाज मनू भाकरसह हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश यांची ध्वजवाहक म्हणून निवड करताना भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला आनंद होत आहे.”
आयओए अध्यक्ष पीटी उषा यांनी सांगितले की, “श्रीजेश हा आयओए (IOA) नेतृत्वात भावनिक आणि लोकप्रिय पर्याय होता. सध्या सुरू असलेल्या गेम्समध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकल्यानंतर श्रीजेशने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतली. शुक्रवारी, हॉकी इंडियाने या अनुभवी खेळाडूची ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. तो आता युवा संघाला भविष्यातील आव्हानांसाठी तयार करेल.”
भारताने गुरुवारी स्पेनचा 2-1 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले आणि यासह श्रीजेशने हॉकीला अलविदा केला. श्रीजेश दीर्घ काळापासून भारतीय हॉकी संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. श्रीजेशने पॅरिस ऑलिम्पिकमध्येही चमकदार कामगिरी केली आणि प्रतिस्पर्धी संघासमोर भिंतीसारखा उभा राहिला. स्पेनविरुद्धच्या कांस्यपदकाच्या लढतीतही श्रीजेशने अखेरच्या क्वार्टरमध्ये शानदार सेव्ह करत त्यांना आघाडी घेण्यापासून रोखले. अशा प्रकारे संघाने श्रीजेशला विजयासह निरोप दिला.
निवृत्तीच्या निर्णयावर श्रीजेश काय म्हणाला?
शुक्रवारी श्रीजेशच्या निवृत्तीनंतर चाहते त्याच्या पुनरागमनाची मागणी करत होते. याबाबत तो म्हणाला की, ” मला वाटते की, ऑलिम्पिक खेळातून पदकासह निरोप घेण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही रिकाम्या हाताने घरी जात नाही, ही मोठी गोष्ट आहे. मी लोकांच्या भावनांचा आदर करतो पण काही निर्णय अवघड असतात. योग्य वेळी निर्णय घेतल्याने परिस्थिती सुंदर बनते. त्यामुळे माझा निर्णय बदलणार नाही.संघाने चमकदार कामगिरी करत हा सामना अविस्मरणीय बनवला आहे. टोकियोमध्ये जिंकलेल्या पदकाचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. यापदकामुळेच ऑलिम्पिकमध्ये आपण आणखी पदक जिंकू शकतो हा आत्मविश्वास मिळाला.”