पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून भारतासाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरला (Manu Bhaker) 25 मीटर एअर पिस्टल प्रकरातील अंतिम फेरीत पदक मिळवण्यात अपयश आले आहे. यासह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग तिसरं पदक पटकावण्याची तिची संधी हुकली आहे.
आपल्या अव्दितीय कामगिरीच्या जोरावर इतिहास घडविणारी भारताची युवा नेमबाज मनू हिला शनिवारी झालेल्या 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात 28 गुणांसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या जिन यांग हिने 37 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. याशिवाय फ्रान्सच्या कॅमिली जेड्रझेजेव्स्कीनेही 37 गुण मिळवले पण तिला दुस-या स्थानासह रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं तर हंगेरीच्या वेरोनिका मेजर हिने 31 गुणांसह तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले.
25 मीटर पिस्टल क्वालिफिकेशनमध्ये 40 पैकी फक्त 8 जणांना अंतिम फेरीत जागा पटकावता आली होती. तर फायनलमध्ये 10 सिरीजमध्ये 50 शॉट मारले गेले. पहिल्या तीन सिरीजनंतर एलिमिनेशन सुरू झाले. मनु भाकर 5 सिरीजनंतर तिसऱ्या स्थानावर होती. पण 8 सिरीजनंतर ती चौथ्या क्रमांकावर राहिली. यामुळे ती पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली.
असं असले तरी, टोक्यो ऑलिम्पिकमधील अपयशानंतर मनू भाकर हिनं जोरदार कमबॅक करत पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवणारी मनू भाकर स्वातंत्र्यानंतरची भारताची पहिलीच ऑलिम्पियन खेळाडू ठरली आहे. मनू भाकरनं यापूर्वी 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताला पहिलं कांस्यपदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर सरबज्योत सह 10 मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरी प्रकारात मनू भाकरनं आणखी एक कांस्य पदक देशाला मिळवून दिलं.
दरम्यान, भारतानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत तीन पदक कांस्य पदकं जिंकली आहेत. विशेष बाब म्हणजे यातील सर्व पदकं नेमबाजीत मिळालेली आहेत. एक पदक मनू भाकरनं, दुसर पदक मनूनं पण सरबज्योत सिंहसोबत तर तिसरं पदक स्वप्नील कुसाळे याने मिळवले आहे.