पॅरिस – पॅरिस ऑलिम्पिकला एक वर्ष बाकी असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. पॅरिस ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा ब्रिगेटी हेन्रिक्स यांनी आपल्या पदाचा राजीमाना दिला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत ब्रिगेटी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. पॅरिसमध्ये ही स्पर्धा पुढील वर्षी 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. समितीचे माजी सरचिटणीस दिदियर सेमिनेट यांच्याशी ब्रिगेटी यांचा वाद झाला होता. या समितीच्या कामकाजाचे ऑडिट करण्याची मागणी ब्रिगेटी यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे केली होती. त्यानंतर मानसिक ताणाचे कारण देत ब्रिगेटी या दोन महिने रजेवर गेल्या होत्या. डिसेंबर महिन्यात त्या पुन्हा कार्यरत झाल्या. सेनिमेट यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले होते, त्याचवेळी ब्रिगेटी यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
समितीचे विद्यमान सरचिटणीस अस्टेड गुयार्ट यांच्याकडे सध्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत पॅरिस ऑलिम्पिक संघटना नव्या अध्यक्षाची निवड करतील.
आपल्याला लक्ष्य केले जात आहे. तसेच आपल्या विरोधी मोहीम सुरू करण्यात आली होती. माझ्याबाबत खोटी माहिती प्रसारीत करुन माझे मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ब्रिगेटी यांनी केला आहे.