Paris Masters 2024 : भारताचा स्टार खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन हे पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पुरुष दुहेरीच्या खडतर लढतीत पराभूत होऊन बाहेर पडले आहेत.
या एटीपी 1000 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बोपण्णा आणि एबडेन या तिसऱ्या मानांकित जोडीला नेदरलँड्सच्या वेस्ली कूलहॉफ आणि क्रोएशियाच्या निकोला मेक्टिक यांच्याकडून 6-7, 5-7 असा पराभव पत्करावा लागला. हा सामना एक तास 46 मिनिटे चालला.दरम्यान, बोपण्णा आणि एबडेन ही जोडी या हंगामातील शेवटची स्पर्धा एटीपी फायनल्ससाठी आधीच पात्र ठरली आहे.
त्याचवेळी, जर्मनीच्या तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हने स्टेफानोस त्सित्सिपासचा 7-5, 6-4 असा पराभव करत पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि ग्रीक खेळाडूला एटीपी फायनलच्या शर्यतीतून बाहेर काढले.
फ्रेंच ओपनचा उपविजेता झ्वेरेव्हचा पुढील सामना 2022चा चॅम्पियन होल्गर रुनेशी होणार आहे. झ्वेरेव्ह यानं गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा या हार्डकोर्ट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असली तरी त्याला कधीही विजेतेपद मिळवता आलेले नाही.तर उपांत्यपूर्व फेरीच्या आणखी एका सामन्यात रूनने ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्स डी मिनौरचा 6-4, 4-6, 7-5 असा पराभव करत आगेकूच केली.