खळदच्या सेंट जोसेफ शाळेत पालकांचा ठिय्या

पाच तासांच्या प्रयत्नानंतर निघाला तोडगा : 50 टक्‍के फी भरण्यास पालक तयार

खळद – येथील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल प्रशासनाने मागील शैक्षणिक वर्षाची फी न भरणाऱ्या पालकांना या वर्षीच्या शैक्षणिक पुस्तकांचे चलन न देण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त पालकांनी गुरुवारी (दि. 6) शाळा प्रशासनासमोर ठिय्या मांडला. अखेर सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप व पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी 50 टक्‍के फी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्कूल प्रशासनाच्या वतीने अवाजवी फी घेण्यात येत होती. त्यामुळे पालकांनी याची तक्रार शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करून जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी फी वसूल करण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढील कार्यवाही होईपर्यंत आम्ही फी भरणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली. तर या निर्णयाविरोधात शाळेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच प्रशासनाने पालकांची अडवणूक करण्यास सुरुवात केली आहे. यावर पालकांनी शाळेत येऊन आम्ही फी भरण्यास तयार आहोत. मात्र, न्यायालयाचा निकाल येईपर्यंत आम्ही कोणतीही फी भरणार नाही, अशी भूमिका घेतली. तर शाळा प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम होती.

यावर पाच तासांच्या चर्चेनंतर अखेर शाळा व पालक संघ यांच्यात पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप व सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांनी समन्वय साधत 2018-19 या शैक्षणिक वर्षाची 50 टक्‍के फी भरणाऱ्या पालकांना पुस्तके देण्याचा प्रस्ताव मांडला. याला शाळा व्यवस्थापन व पालकांनी संमती दिली. तसेच अनेक पालकांना याबाबतचे चलनही भरले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, पालक संघाचे अध्यक्ष प्रदीप जगताप, दिलीप कामथे, रणधीर जगताप, रवींद्र जाधव, मोनाली पाटणकर, संध्या लोणकर आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.