पुणेः काल रात्री उशिरा राज्यातील जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत काही बदल करण्यात आले आहेत. तर काही मंत्र्यांवर पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील २१ पैकी ९ आमदार हे भाजपचे असताना देखील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार झाले आहेत. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ कोणत्या ‘दादां’च्या गळ्यात पडणार याची चर्चा केली जात होती, पण अखेर पुन्हा एकदा ‘अजितदादा’चं पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्याचे पालकत्व देखील अजित दादांकडे असणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्र्यांची यादी कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. यात प्रामुख्याने रायगड, सातारा, बीड, जळगाव, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून मोठी रस्सीखेच झाल्याचे पाहिला मिळाले. सगळ्यात जास्त चर्चा केली जात होती ती बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबात. पण मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आला. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना पालकमंत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आले. यानंतर बीडचे पालकमंत्री पद पंकजा मुंडे यांना मिळेल, अशी चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनीच बीड जिल्ह्याचे पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे.
दादांकडे पुणेकरांच्या या अपेक्षा
अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने पुणेकरांच्या या अपेक्षा कधी पूर्ण होणार याची चर्चा आता केली जात आहेत. प्रस्तावित पुण्याचा रिंगरोड प्रकल्पाला गती देण्यात यावी. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्प उभारण्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे. पुण्यातील वाहतूक कोंडीबाबत उपायोजना करून त्या प्राधान्याने सोडवाव्यात. पुण्याचा पाणी कोटा वाढवून मिळावा अशा अनेक मागण्या पुणेकरांकडून केल्या जात आहेत.
प्रजास्ताक दिनी ध्वजारोहण
खरंतर येत्या आठवडाभरावर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन आला आहे. या दिवशी जिल्ह्याचे प्रमख अर्थात पालकमंत्री जिल्ह्याच्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. यामुळे या पूर्वसंध्येला जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे २६ जानेवारी या दिवशी पालकमंत्री त्यांच्या हस्ते जिल्ह्याच्या ठिकाणी ध्वजारोहण करणार आहेत.