विडणी – विडणी येथील महात्मा फुले एज्यूकेशन सोसायटीच्या उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षकांच्या प्रश्नांवरून पालकांनी शुक्रवारी धरणे आंदोलन केले.
या शाळेत व कॉलेजमध्ये एकूण 19 पदे मंजूर असून त्यापैकी नऊ शिक्षक सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ही पदे संस्थेने वेळोवेळी भरली तरी त्यांना शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाली नाही. हे शिक्षक पाच-सहा वर्षांपासून विनावेतन काम करत आहेत. संस्थेच्या सभासद व संचालकांमध्ये दुफळी असून त्याचा फटका शिक्षकांना बसत आहे. शिक्षकांच्या मान्यतेच्या प्रलंबित विषयावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा पालक वर्गाने दिला होता. त्यानुसार शाळेच्या गेटसमोर सकाळी 9 वाजता आंदोलन सुरू झाले.
उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तेथे आल्यावर पालकांनी त्यांना मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. शाळेला पूर्ण वेळ शिक्षक मिळावेत. सध्या काम करत असलेले शिक्षक कायम करावेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर रमेश चव्हाण यांनी संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांबरोबर चर्चा केली. या शैक्षणिक वर्षात काम करत असलेले शिक्षक पूर्ण वेळ राहतील, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.