पालकांनी रोखले सातारा सैनिक स्कूलचे प्रवेशद्वार

प्रवेशासाठी पैशांची मागणी?

सैनिक स्कूलमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश सुकर करायचा असेल तर ठरावीक खात्यात पैसे भरा, असे सांगणारे फोन पालकांना गेल्याने प्रवेश परीक्षा प्रक्रियेवर संशयांचे ढग जमा झाले आहेत. फोन करणारी व्यक्ती हिंदीतून बोलत पालकांना पंधरा हजार रुपयांची मागणी करत होती. या कॉलचे रेकॉर्डिंग काही पालकांनी केल्याने परीक्षेत गैरप्रकार घडल्याच्या आरोपांना पुष्टी मिळत आहे.

सातारा – सातारा सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेच्या गुणांकनात फरक पडल्याचा आरोप करत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शुक्रवारी दुपारी सातारा सैनिक स्कूलच्या प्रवेशद्वाराचा मार्ग रोखला. याबाबत प्रशासनाने चर्चा करण्यास नकार दिल्याने पालकांना दिवसभर ताटकळत बसावे लागले.

सातारा सैनिक स्कूलची प्रवेश परीक्षा पंधरवड्यापूर्वी एका एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 30) सायंकाळी जाहीर झाला. मात्र, विद्यार्थ्यांचे सराव सत्राचे गुणांकन व प्रवेश परीक्षेचे गुणांकन यात मोठी तफावत आढळल्याने आज सकाळी 11 वाजल्यापासून सैनिक स्कूलच्या प्रवेशद्वारावर पालकांनी गर्दी केली. मात्र, प्रशासनाने पालकांशी चर्चा करण्यास नकार देत मुख्य प्रवेशद्वार लावून घेतले.

प्राचार्या मिश्रा यांच्याशी पालकांनी चर्चा केली.ही परीक्षा राज्यस्तरावरून एका एजन्सीच्यावतीने घेण्यात आल्याने यामध्ये शाळेचा काहीही संबंध नसल्याचे सांगत त्यांनी काही पालकांना माघारी पाठवले. शाळेच्या प्रवेशद्वारावर दुपारनंतर पालकांची गर्दी वाढली. मात्र, प्रशासनाने पालकांशी चर्चा करण्यास नकार दिला. प्राचार्या मिश्रा यादेखील पुन्हा फिरकल्या नाहीत. काही संतप्त पालकांनी प्रवेशद्वार रोखल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, अनुचित प्रकार घडला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.