वॉशिंग्टन – अमेरिकेत एच 1-बी वर्क व्हिसा किंवा ग्रीन कार्डच्या आधारे राहणाऱ्या भारतीयांना आता वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागतो आहे. या भारतीयांच्या अपत्यांचा जन्म अमेरिकेतच झाला असल्याने मुलांना जन्माने अमेरिकेचे नागरिकत्व लाभले आहे. या मुलांना भारतात आणण्यास अमेरिकेच्या प्रशासनाकडून विरोध होतो आहे.
जगभर करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जी प्रवासबंदी घातली गेली आहे. त्यानुसार कोणत्याही विदेशी नागरिकांना भारतात प्रवेश दिला जाणार नसल्याचा नियम करण्यात आला आहे. केंद्र सरकारने गेल्या महिन्यात लागू केलेल्या आणि गेल्या आठवड्यात दुरुस्ती केलेल्या नियमांमध्ये विदेशी नागरिक आणि मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांसाठीची व्हिसामुक्त प्रवेश देणारी ओसीआय कार्डची सुविधा स्थगित करण्यात आली आहे. तसेच एच 1-बी व्हिसासाठीची नोकरी गेल्याने काहींना 60 दिवसांच्या आत भारतात परत जावे लागणार आहे.
मात्र त्यांच्या मुलांचे नागरिकत्व अमेरिकेचे असल्याने त्यांना भारतात नेता येऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे. अशा दाम्पत्याच्या मुलांना भारताचा वैध व्हिसा असला तरीही परतीची तिकिटे देण्यास एअर इंडियाने नकार दिला आहे. आई-वडील भारतीय नागरिक तर मुले अमेरिकन नागरिक असल्याने हा तिढा निर्माण झाला आहे. भारतीय दूतावास आणि एअर इंडियाचे अधिकारी सहकार्य करत असले तरी भारत सरकारच्या बदललेल्या नियमांमुळे आपले हात बांधले गेले असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भारत सरकारने मानवतेच्या भूमिकेतून या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहान या दाम्पत्यांनी केले आहे.
दुसरीकडे एच 1-बी व्हिसाची मुदत संपल्यानंतर 60 दिवसात मायदेशी जाऊ
एच 1-बी व्हिसाची मुदत संपल्याने 60 दिवसात परत गेल्यास पुन्हा अमेरिकेत यायचे असल्यास व्हिसाच्या तांत्रिक अडचणी उद्भवू शकतील. म्हणून आपले वास्तव्य वाढवण्यासाठी इमिग्रेशन विभागाला विनंती करण्याचाही काही जण विचार करत आहेत.
नोकरी गमावल्यास पुढे 60 दिवस अमेरिकेत राहू देण्याचा कालावधी 180 दिवसांपर्यंत वाढवावा, अशी मागणी व्हाईट हाऊसकडे केली गेली होती. मात्र अद्याप त्यावर काहीही निर्णय झालेला नाही. अशाप्रकारे किती भारतीयांची नोकरी गेली याची नक्की आकडेवारी उपलब्ध नाही.