प्रशिक्षणानंतर आता पालक संवाद मार्गदर्शिका

कराड पंचायत समितीचा एकात्मिक बालविकासअंतर्गत उपक्रम; पालकांकडूनही प्रतिसाद

कराड – एकात्मिक बालविकास अंतर्गत बालविकासाला नवी दृष्टी देण्याच्या हेतूने कराड पंचायत समितीने पालक संवाद मार्गदर्शिका प्रकाशित केली आहे. आईची बाळाची काळजी घेण्याची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने या मार्गदर्शिकेत माहिती देण्यात आली असून पुणे येथील क्षितीज स्वयंसेवी संस्थेच्या सौ. उमा माने यांनी या मार्गदर्शिकेचे उत्कृष्ट असे लिखाण केले आहे. त्यामुळे ही मार्गदर्शिका अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या उपक्रमाला पालकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या संकल्पनेतून ही मार्गदर्शिका बनविण्यात आली आहे. मार्गदर्शिकेचे प्रकाशन कराड पंचायत समिती आणि आयडीबीआय यांच्या मदतीने करण्यात आले आहे. पालक संवाद या मार्गदर्शिकेमुळे अंगणवाडीतील पालकांशी मासिक सभेत पालकत्व या विषयावर संवाद साधण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मदत होणार आहे. या मार्गदर्शिकेत पालकत्व संकल्पनेतील बालविकास, बालआरोग्य आणि बालशिक्षण या विषयांवर माहिती देण्यात आली आहे. तसेच चित्ररूपात व सोप्या भाषेतही माहिती देण्यात आली आहे.

बाळाचा 80 टक्के बौद्धिक, विकास व बहुतांशी शारीरिक विकास वयाच्या सहा वर्षांपर्यंत पूर्ण होतो. म्हणून बाळाच्या सर्वांगिण विकासामध्ये हे वय अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे याच वयात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामध्ये पालकांचा पाठिंबा मिळाल्यास बालकांचा विकास झपाट्याने होण्यास मदत होऊ शकते. मात्र पालकांनी तटस्थ भूमिका घेतल्यास बालविकासाची दिशा भरकटण्याची शक्‍यता असते.

प्रत्येक गावात एक बालप्रगती केंद्र सुरू केल्यास पालकत्वाचे अनेक प्रश्‍न गावस्तरावर सोडवले जातील असा विचार गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या मनात आला. या विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी पुण्याच्या क्षितीज संस्थेच्या संस्थापिका उमा माने यांच्याशी त्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी पालकसंवाद मार्गदर्शिका काढण्याच्या उपक्रमाला दिशा दिली.

पालकसंवाद प्रक्रिया कराड पंचायत समितीने गटविकास अधिकारी डॉ. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2018 मध्ये कराड तालुक्‍यातील सातशे अंगणवाड्याच्या माध्यमातून सुरू केली. या प्रक्रियेचा कालावधी तीन वर्षांचा निश्‍चित केला. त्यात बालविकासाचे सहा, बालआरोग्याचे तीन, बालशिक्षण तीन असे विषय निश्‍चित करण्यात आले. प्रत्येक अंगणवाडीत पालक संघाची स्थापना करून त्यामध्ये अध्यक्षही निवडण्यात आला आहे. अंगणवाडी सेविका व पालक संघांच्या अध्यक्षांना तीन प्रशिक्षणे देऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. आता पालक संवादामार्फत पालकत्त्वाचे विषय पालकांपर्यंत पोहोचवण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

वर्षभरात बालविकास संकल्पना, बालकाचे आरोग्य, पालकत्व, पूर्व प्राथमिक शिक्षण, बालविकासात पालकांची भूमिका, बालकाला हाताळण्याची पद्धती, बालविकासात समाज व शासनाची भूमिका हे विषय घेऊन काम करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात अंगणवाडीच्या पर्यवेक्षिकांना चार दिवसांचे प्रशिक्षण तर दुसऱ्या टप्प्यात अंगणवाडी सेविका व पालकसंघाच्या अध्यक्षांना वर्षभरात तीन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे पालकत्वाच्या पद्धतीमध्ये बदल झाल्याचे अनेक पालकांकडून प्रतिक्रीया मिळाल्या आहेत.

वर्षभरातील प्रशिक्षणांसाठी सभापती फरिदा इनामदार, उपसभापती सुहास बोराटे, यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने खूप फायदा झाला.
पालक संवाद या उपक्रमाद्वारे दरमहा अंगणवाडीत बालविकासाचे कौशल्य, अनुभव पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीही हे काम सुरू होते. परंतु त्यात नेमकेपणा नव्हता. संस्कार करायचे म्हणजे काय करायचे हे नेमके पालकांना समजत नव्हते. प्रत्येक वेळी मुलांना वेळ द्या, संतुलित आहार द्या ही परवलीची वाक्‍ये कानावर पडत होती.

मात्र ती नेमकी कशा पद्धतीने करायची हे अनेक पालकांच्या लक्षात येत नव्हते. अंगणवाडी सेविका व पालक संघाच्या अध्यक्षांना त्यासाठी लेखी स्वरूपात माहिती देणे आवश्‍यक वाटू लागल्याने कराड पंचायत समितीने त्याची मार्गदर्शिका तयार करण्याचे ठरविले. या मार्गदर्शिकेमुळे बालविकासाला नवी दृष्टी मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.