मुंबई – राज्याच्या गृहमंत्र्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंह हे केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली असावेत म्हणूनच त्यांना हे आरोप केले असावेत असा दावा प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, पदावर असलेल्या अधिकाऱ्याने सत्तेतील व्यक्तींवर आरोप करण्याची देशातील ही पहिली वेळ नाही. या आधीही असे अनेक प्रकार घडले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना सावंत म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यात गृहमंत्री देशमुख यांना करोना झाल्याने ते रूग्णालयात होते. मी त्यावेळी त्यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने दोन वेळा संपर्क साधला होता. जर परमवीरसिंह यांचा दावा खरा असेल असे आपण मानले तर ते त्यांची बदली होईपर्यंत गप्प कसे बसले असा सवालही त्यांनी केला. आपले निकटचे सहकारी सचिन वाझे यांची एनआयए मार्फत चौकशी सुरू असल्याने परमवीरसिंह हे केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली असावेत असे मतही त्यांनी व्यक्त केले. हे सगळे प्रकरण स्क्रीप्टेड आहे, आणि भाजपला राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे असा आरोपही सावंत यांनी केला.