महासंघातील पदासाठी दिला कारकीर्दीचा बळी
नवी दिल्ली – रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत शॉटपूट क्रीडा प्रकारात पदक जिंकणारी दिव्यांग खेळाडू दीपा मलिक हिने आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. भारतीय दिव्यांग महासंघाच्या अध्यक्षपदासाठी तिने आपल्या कारकीर्दीचा बळी दिल्याचे सांगितले जात आहे.
मैदानी स्पर्धेत दिव्यांगांच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणारी दीपा भारताची पहिलीच खेळाडू ठरली होती. 2016 सालच्या ब्रझिलमध्ये झालेल्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत तिने शॉटपूट क्रीडा प्रकारात दीपाने रजतपदक पटकावले होते. तसेच आसिया-ओशनिया स्पर्धेतही दीपाने पदकाची कमाइ करत अशी कामगिरी करणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मानही मिळवला होता. भारताच्या क्रीडा आचारसंहितेतील नियमानुसार जर एखाद्या खेळाडूला संघटनेवर पद स्वीकारुन काम करायचे असेल तर त्या खेळाडूला आधी स्पर्धात्मक पातळीवरुन निवृत्ती जाहीर करावी लागते. संघटनेवर कार्यरत राहण्याचा विचार दीपाने अनेकदा बोलून दाखवला होता. संघटनेच्या आचारसंहितेचे पालन करतच तिने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.
एक अव्वल मैदानी खेळाडू म्हणून नावारुपाला येत असतानाच दीपाला वयाच्या तिशीत लकवा आला व त्यामुळे पुढील काळात तिला दिव्यांगांच्या स्पर्धेत सहभागी व्हावे लागले. गेले दोन दशके ती अशा स्पर्धांमध्ये सहभागी होत आपली कारकीर्द सोनेरी साकारत आहे. लकवा आल्यानंतर तिने जेव्हा यावर उपचार करुन घेण्यास सुरुवात केली तेव्हा वैद्यकीय तज्ज्ञांनी तिला कधीच चालू शकणार नाहीस असे सांगितले होते. मात्र, आपल्या अफाट जिद्दीच्या जोरावर दीपा केवळ चालायला लागली असे नाही तर तिने क्रीडाक्षेत्रात देशाचे नाव उंचावताना पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले.
तीच्या पॅरालिम्पिकपदकाच्या कामगिरीसाठी तसेच अत्यंत यशस्वी कारकीर्द घडविण्यासाठी अफाट मेहनत घेतल्याने मानाच्या खेलरत्न पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दीपाला गौरविण्यात आले होते.