मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीने स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. स्वप्नील जोशीने त्याच्या करिअरची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली होती. त्यानंतर त्याला बराच मोठा स्ट्रगल करावा लागला होता.
“मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटातून त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्यानंतर आलेल्या “दुनियादारी’मधील श्रेयसने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचविले. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेल्या “समांतर’ने साऱ्या प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या “समांतर’ने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली.
यानंतर आता समीर विध्वंस दिग्दर्शित “समांतर 2’ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती, ती यात आता पुढे काय पाहायला मिळणार याची. ही उत्सुकता अधिक न ताणता “समांतर 2’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.
यात दोन व्यक्ती, एका आयुष्यात दोन वेगळ्या काळात सारख्याच नशिबाचा सामना करत आहेत. चक्रपाणीचा भूतकाळ कुमारचा भविष्यकाळ ठरवू शकेल?
हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागेल. तत्पूर्वी प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी “समांतर 2’चा ट्रेलर 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.