ऍम्बुलन्स प्रकरणी पप्पू यादव यांना अटक

पाटणा – बिहारमधील मधेपुरा लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि जन अधिकार पार्टीचे नेते पप्पू यादव यांना अटक करण्यात आली आहे. पाटणा पोलिसांनी ही कारवाई केली. पप्पू यादवांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पप्पू यादव यांनी भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या गावाजवळ डझनभर ऍम्ब्युलन्स पकडल्या होत्या. खासदार निधीतून या सर्व ऍम्ब्युलन्स खरेदी केल्या होत्या. पप्पू यादव यांच्यावर सरकारी संपत्तीचे नुकसान करणे आणि कोव्हिड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पप्पू यादव यांनी स्वत: ट्विट करुन आपल्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईची माहिती दिली. मला अटक करुन पाटण्यातील गांधी मैदान पोलीस स्टेशनला नेले असल्याचे त्यांनी त्या ट्‌वीटमध्ये म्हटले होते.

दरम्यान, पप्पू यादव यांनी आजच आणखी एक ट्विट केलं होतं. करोना काळात जर जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्‍यात घालून मदत करणं गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे. मला फाशी द्या किंवा जेलमध्ये पाठवा. झुकणार नाही, थांबणार नाही. लोकांना वाचवणार, बेईमानांचा पर्दाफाश करणार, असे त्यांनी या ट्‌वीटमध्ये म्हटले आहे.

पप्पू यादव यांच्यावरील आरोपानुसार, त्यांनी लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करत, अमनौर इथे जाऊन, विश्वप्रभा केंद्राबाहेर उभ्या असलेल्या ऍम्ब्युलन्सची पाहणी केली होती. पप्पू यादव उर्फ राजेश रंजन 7 मे रोजी आपल्या कार्यकर्त्यांसह ऍम्ब्युलन्स पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी करना नियमांचे उल्लंघन केले. इतकंच नाही तर त्यांनी ऍम्ब्युलन्सची तोडफोड केल्याचाही आरोप आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.