अहमदाबाद -महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्येही पेपर फुटीचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली. तसेच, एका आरोपीच्या घरातून तब्बल 23 लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली.
गुजरात सरकारच्या वतीने मागील रविवारी मुख्य लिपिक पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. 186 जागांसाठी सुमारे 88 हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. त्या परीक्षेचा पेपर (प्रश्नपत्रिका) फुटल्याची माहिती समोर आली. त्यानंतर गुजरात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
परीक्षेआधी पेपर उपलब्ध करण्यासाठी काही उमेदवारांकडून मोठ्या रकमा घेण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परीक्षेच्या एक दिवस आधी काही उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे पुरवण्यात आली. संबंधित उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रांवर पोहचवण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याचे समजते.
गुजरातमधील पेपर फुटीच्या घोटाळ्याचे स्वरूप व्यापक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तपासासाठी आणि आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. पेपर फुटी प्रकरणी आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे.