पुणे – धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने पानशेत धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. पानशेत धरण सुमारे 92 टक्के भरले आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून विसर्ग कमी करण्यात आला असून बुधवारी सायंकाळी 2 हजार 568 क्युसेकने विसर्ग सुरू होता.
समाधानकारक पावसामुळे खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांत मिळून 23.85 टीएमसी, म्हणजे 81.83 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. बुधवारी दिवसभरात खडकवासला धरण परिसात 4, पानशेत-77, वरसगाव-70 आणि टेमघर धरण क्षेत्रात 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मंगळवारी 13 हजार क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर खडकवासला परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या कालव्याद्वारे 1 हजार, तर मुठा नदीत 2,568 क्युसेकने विसर्ग केला जात आहे.