पानमळा क्रॉसिंग रस्ता ठरतोय जीवघेणा; पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांत वाढ

राजगुरूनगर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड बाह्यवळण घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पानमळा येथे रस्ता क्रॉसिंग (रस्ता बदल वळण) जीवघेणे ठरत आहे.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड बाह्यवळण रस्त्याच्या कामात मोठी दिरंगाई झाली असताना या कामात अनेक तांत्रिक दोष समोर येत आहेत. या कामाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे.

सर्वपक्षीय नेत्यांनी आपापल्या परीने महामार्गाचे उद्‌घाटन केले. उद्‌घाटन होऊन अनेक महिने झाले तरीही एक लेन बंद आहे. महामार्गावरील पानमळा चौकात अनेक अपघात घडत आहेत. असुरक्षित स्थितीत येथून सर्वसामान्य वाहनचालक, स्थानिक शेतकरी, विद्यार्थी जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावर खेड-सिन्नर रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. त्यात राजगुरूनगर जवळच्या खेड बाह्यवळण घाटात तुकाईवाडी आणि पानमळा येथे लगतच्या गाव, वस्त्यांमध्ये ये-जा करण्यासाठी, वाहने वळवुन रस्ता बदलण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. तुकाईवाडी येथे सिग्नल यंत्रणा गरजेची असताना केवळ लाल दिवा लावला आहे.

पानमळा वळण अत्यंत धोकादायक ठरू लागले आहे. उतारावरून येणारी वाहने वेगात असतात. त्यांच्यामुळे रस्ता बदलणाऱ्या वाहनांचा अनेकदा अपघात झाला आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर येथे गतीरोधक लावले आहेत. मात्र सर्व्हिस रस्त्यावर काही एक अडथळा नसल्याने वाहनचालक त्या रस्त्याने वेगात येतात व चौकात वळणाऱ्या वाहनांना किंवा पादचाऱ्यांना अपघात होत आहे.

वाहतूक मोठ्या प्रमाणावर असताना रस्ता बदलण्यासाठी वळणारे वाहन सुरक्षित उभे राहु शकेल अशी दुभाजकाची रुंदी असणे गरजेचे आहे. मात्र येथील दुभाजक अत्यंत कमी रुंदीचे असल्याने त्याबाहेर असलेल्या वाहनाला जाणाऱ्या वाहनाचा धक्का बसतो. अशा अनेक समस्या येथे असताना त्याकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

नागरिकांनी आजी माजी खासदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन याबाबत अनेकदा साकडे घातले आहे. मात्र किरकोळ कारवाई करून केवळ मलमपट्टी केली जात असल्याची तक्रार वरची भांबुरवाडीचे सरपंच विजय थिगळे, तुकाईवाडीचे उपसरपंच साहेबराव गाढवे, कॉंग्रेसचे सुभाष गाढवे, स्थानिक शेतकरी व व्यावसायिक करण सांडभोर आदींनी केली आहे.

महामार्ग रस्त्याच्या नियोजनात पानमळा, तुकाई वाडी येथे भुयारी व्यवस्था निर्माण करायला हवी होती. पूर्वेकडील भांबुरवाडी, तुकाईवाडी, वेहेळदरा, झणझणस्थळ आणि इतर तसेच पश्‍चिम बाजुला तिन्हेवाडी, सातकरस्थळ, कोहिनकरवाडी व इतर मोठ्या गावांची वर्दळ येथूनच होते. उताराने येणाऱ्या वेगातील वाहनांमुळे हा परिसर अपघातग्रस्त ठरत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वरिष्ठ स्तरावरून कायमस्वरूपी उपाययोजना लवकरच अंमलात आणली जाईल.
– दिलीप मोहिते पाटील, आमदार, खेड

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.