महाराष्ट्राच्या राजकारणातील पंकजापर्व! (प्रभात ब्लॉग)

-संदीप कापडे  
माझा वाढदिवस दरवर्षी मी अत्यंत साधेपणाने, माझ्या लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत साजरा करते. यावर्षीही तसेच नियोजन होते. पण गेल्या काही दिवसातील घटनांनी मन विषष्ण झालं आहे… 
महाराष्ट्राच्या राजकारणात खंबीरपणे उभे असलेले नेतृत्व म्हणजे पंकजा मुंडे! स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा सांभाळत त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाच्या  त्या आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. 
 
पंकजा मुंडे-पालवे यांचा आज वाढदिवस पण मुंडे यांनी आपण यावर्षी वाढदिवस साजरा करत नसल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या “माझा वाढदिवस दरवर्षी मी अत्यंत साधेपणाने, माझ्या लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत साजरा करते. यावर्षीही तसेच नियोजन होते. पण गेल्या काही दिवसातील घटनांनी मन विषष्ण झालं आहे. माझ्या महाराष्ट्रातील माझा एक भाऊ ‘काका साहेब शिंदे’ याने स्वतःचा जीव गमावला आहे, एका आईच्या पोटचं लेकरू गेलं ,तिच्या गळ्यातला ताईत गेला, त्या माऊलींच्या दुःखाची कल्पना ही कोणी करू शकत नाही. मी हे सर्व सुन्न होऊन बघत आहे. त्यामुळे या परिवाराच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. सतत लोक शुभेच्छा देण्यासाठी येण्याची विचारणा करत आहे.  त्यामुळे कृपया नोंद घ्यावी मी वाढदिवस साजरा करणार नाही, पुष्पगुच्छ ,सत्कार स्वीकारणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 
 
पंकजा मुंडे यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द अत्यंत वादाची ठरली. त्यांच्यावर अनेक आरोप झाले. चिक्की घोटाळा, शनी शिगणापूरला चौथर्‍यावर स्त्रियांना प्रवेश प्रकरण, दुष्काळाताही मराठवाड्यातील दारू कारखान्यांचा पाणी पुरवठा, अश्या अनेक प्रकरणांमुळे विरोधकांनी मुंडेंना धारेवर धरले मात्र या लढवय्या वृत्तीच्या नेतृत्वाने कधीच पाठ फिरवली नाही. पुढे आलेल्या परिस्थितीचा धाडसाने सामना करणे ही त्यांची खासियतच! 
 
पंकजा मुंडे जलयुक्त शिवारचे कामे करण्यात अग्रेसर होत्या. मात्र या मध्ये श्रेयवाद निर्माण झाला. आणि मुख्यमंत्र्यांनी मुंडेंकडून जलसंवर्धन आणि रोजगार हमी योजना या खात्यांचे मंत्रिपद काढून घेतले. त्यानंतर जलसंवर्धन खाते काढून घेतल्यावर बँकॉक येथे होणार्‍या जागतिक पाणी परिषदेला न जाण्याच्या निर्णय मुंडे यांनी ट्‌विटरवर जाहीर केला. यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले होते. ट्‌विटरवरच्या या  दोघांच्या जाहीर संवादाबद्दल केंद्रातिल पक्षश्रेष्ठींनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
 
पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकवेळा चाणक्य नीतीचा वापर केला. तो आता नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला. भाजप आणि राष्ट्रवाची ही लढाई दोन नेत्यांमध्ये लागली ती म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आणि पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ रमेश कराड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीचा दणका, अशी वार्ता पसरू लागली होती. मात्र कराड यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. व्यवस्थापन कौशल्याचा उपयोग करून पंकजा मुंडेनी धनंजय मुंडेना जोरदार झटका दिला. राष्ट्रवादीने उमेदवार घोषित करण्यापूर्वीच पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले सुरेश धस यांना उमेदवारी दिली होती. आणि ते विजयी देखील झाले. मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तोंडातिल घास हिरावून घेतला. त्यामुळे पक्षातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. 
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाना परिचित असलेली राजकीय लढाई म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन भावांची २०१२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे यांना अनेक राजकीय धक्के मिळाले होते. त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर गोपीनाथ यांचा बालेकिल्ला मानला जाणारा परळी हा भाग ‘राष्ट्रवादी’मय झाला होता.  हे सर्व साकार करण्यात धनंजय मुंडे यानाचा सिंहाचा वाटा होता. या सर्व प्रकरणानंतर गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर ‘आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही; पण कोणी आमच्या वाटेला आले तर, त्यांना संपविल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्जना केली होती. हीच गर्जना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय आखाड्यात कायम ठेवली आहे. 
(डिस्क्लेमर : या लेखात व्यक्त करण्यात आलेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी ‘प्रभात’चे व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही.)
 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)