पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये भाजपात गोंधळ !

मुंबई : “राजकारणात व जबाबदारीत झालेल्या बदलाचा व बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्‍यकता आहे. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आदी गोष्टींचा विचार करुन मी 12 डिसेंबर रोजी आपल्यासमोर येणार असल्याचे सूचक वक्तव्य भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकद्वारे केल्याने भाजपात खळबळ उडाली आहे.

भाजपच्या नेत्यांनी पंकजा मुंडे कायम भाजपसोबतच राहणार आहेत, असे स्पष्टीकरण केले. तर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडेच काय, राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगून गोंधळात भर घातली आहे.

भाजपच्या बीड जिल्ह्यातील नेत्या आणि माजी ग्रमविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे. पंकजाने आपल्या पोस्टमध्ये “मावळे’ हा शब्द वापरल्याने, शिवाय त्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितल्याने त्या शिवसेनेत जाणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा वेगळा विचार करत आहेत ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांना त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. हा पराभव पक्षातंर्गत विरोधकांनी घडवून आणल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. पराभव पचवून मुंडे पक्षात कार्यरत झाल्या. राज्यातील सत्तासंघर्षाच्या दरम्यान झालेल्या भाजप कोअर समितीच्या बैठकांना त्या उपस्थित होत्या. मात्र, भाजपच्या हातून सत्ता निसटून काही दिवस होत नाहीत तोच पंकजा यांनी काल फेसबुकवर पोस्ट टाकली.

या पोस्टमध्ये त्यांनी येत्या 12 डिसेंबर रोजी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी “गोपीनाथ गडा’वर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे. 12 तारखेच्या पंकजांच्या भाषणाकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले असतानाच आज त्यांनी आपल्या ट्‌विटर हॅंण्डलवरून भाजपला उल्लेख हटवला. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.

अफवा निराधार ! -चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे काल, आज आणि उद्याही भाजपमध्येच आहेत असा दावा केला. पंकजा मुंडे भाजपशिवाय अन्य काही विचार करतील अशी चर्चा दोन दिवसांपासून सुरु आहे. अपघाताने आलेल्या सरकारचं मनातले मांडे खाणं चालू आहे. अशाप्रकारच्या बातम्यांचा कुठलाही अर्थ नाही. पंकजा ताईंशी आमचं बोलणं झालं आहे. त्या असा कोणताही विचार करु शकत नाहीत. या अफवा आणि बातम्या थांबाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. पराभवानंतर कुठल्याही नेत्याला, आपलं काय चुकलं, आपण आत्मपरीक्षण करायला हवं, असे वाटत असते. याचा अर्थ त्या वेगळा विचार करत आहेत असा नवे. त्या कालही भाजपच्या नेत्या होत्या, आजही आहेत आणि उद्याही राहतील. पंकजा ताईंच्या निष्ठेवर भाजपचा पूर्ण विश्वास आहे. पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट ही 12 तारखेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. उगाच चुकीचा अर्थ काढू नये. तसंच शिवसेनेच्या संपर्कात कोणी आहे, असं मला वाटत नाही, असे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.