मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, विरोधकांच्या ताब्यात असणाऱ्या मतदारसंघावर सध्या भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. आणि यासाठीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे महाराष्ट्रात येणार आहे. यावेळी जे.पी. नड्डा चंद्रपूर आणि औरंगाबाद दौरा करणार असून, ते भाजप कार्यकर्त्यांशी सवांद साधणार आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात जे. पी. नड्डा यांची सभा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
दरम्यान, जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमपासून भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. आणि त्यामुळेच आता पंकजा मुंडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी बीड येथे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी दांडी मारली होती.
आणि तेव्हा पासूनच पंकजा मुंडे यांना भाजप पक्षश्रेष्ठींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात येत असल्याची बोललं जात आहे. अश्यातच, जे.पी. नड्डा यांच्या कार्यक्रमाचे पंकजा मुंडे यांना निमंत्रणच मिळालेले नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज झाले आहेत.
“भाजपने ध्यानात ठेवायला पाहिजे की, या महाराष्ट्रामध्ये बहुजन जनतेची एकजूट भाजपच्या पाठीशी उभं करण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिलेली आहे. मुंडे साहेबांप्रमाणे पंकजा मुंडे या ही भाजपात काम करत आहेत. परंतु भाजपचे काही नेते त्यांना बाजूला करत असून, आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये भाजपला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे’. असं त्यांचे समर्थक म्हणत आहेत.