कार्यकर्त्यांना म्हणाल्या साहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत
मुंबई – भारतीय जनता पक्षाने अनेक दिग्गज नेत्यांसह पंकजा मुंडे यांनाही काल विधान परिषदेची उमेदवारी नाकारली. तिकीट नाकारल्याबद्दल एकनाथ खडसे यांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली असली तरी काल दिवसभर पंकजा मुंडे यांनी मात्र या घटनेवर कोणतेही भाष्य केले नव्हते, पण रात्री उशिरा त्यांनी एक ट्विटर संदेश प्रसारित केला.
त्यात त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे की, मी तुमच्यासाठी आहे, आणि तुम्ही माझ्यासाठी आहात. साहेबांचा (कै. गोपीनाथ मुंडे) आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. दिवसभर तुम्ही मला आणि खासदार प्रितम मुंडे यांना फोन केला, पण मी फोन घेतला नाही. कारण मला यावर काहीही बोलायचे नव्हते. मी नाराज नाही. पक्षाच्या चार उमेदवारांना माझ्या शुभेच्छा, असा संदेश त्यांनी ट्विटरवर दिला आहे. या संदेशातील त्यांचा टोन मात्र नाराजी व्यक्त करणारा असला तरी त्यांनी ती उघड करण्याचे टाळले आहे असे बोलले जाते.