बीड: भाजपच्या नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खंद्या समर्थकाने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. महामंडळाचे अध्यक्ष पद न दिल्यामुळे कल्याण आखाडे यांनी पकंजा मुंडेसह भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे बीड जिल्ह्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.
कल्याण आखाडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत भाजपात 13 वर्षे काम केले. मुंडेंच्या हयातीनंतर देखील पंकजा आणि प्रीतम मुंडे यांना साथ दिली.
त्यानंतर भाजपची सत्ता महाष्ट्रात आली. सत्तेत वाटा मिळावा, अशी मागणी आखाडे यांनी केली होती. यावर पंकजा मुंडे यांनी आश्वासनही दिले होते. मात्र पाच वर्षांत त्यांनी आश्वासन पाळले नसल्याचा गंभीर आरोप करत कल्याण आखाडे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
कल्याण आखाडे यांनी पंकजा मुंडे यांना महामंडळावर अध्यक्ष करा, अशी मागणी केली होती. तसेच त्यांनी याच मागणीवर भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र पंकजा मुंडेंनी महामंडळावर घेतले नसल्याने नाराज झालेले आखाडे यांनी पक्षाला रामराम केला आहे.