बी़ड- कोरोनाच्या संसर्गामुळे यावर्षी सर्व सण उत्सव हे साधेपणाने साजरे होत आहेत. दसऱ्याच्या दिवसाला राजकिय क्षेत्रामध्ये विशेष स्थान आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा, संत भगवानबाबा यांचे जन्मगाव सावरगाव येथील दसरा मेळावा हे राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यामार्फत 2014 पासून सावरगाव येथे दसरा मेळाव्याचं आयोजन केले जाते. यावर्षीचा दसरा मेळावा विक्रमी होणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.
यावेळी वेगळ्या पद्ाधतीने दसरा मेळावा साजरा करायचा आहे. दसरा मेळावा ही परंपरा भक्ती आणि शक्तीचा संगम आहे. या वर्षी आपण वेगळा विक्रम करूया. एक वेगळं सिमोल्लंघन् करूया. आपण दरवर्षी शक्तीचा मोठ्या संख्येचा विक्रम करतो, मात्र यावर्षी जास्त संख्येने कार्यक्रम करण्याचा विक्रम करायचा आहे. असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
दसऱ्याला भगवान भक्तीगडावर जाणार असून त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर समर्थकांना मार्गदर्शन करणार आहे. समर्थकांनी कोरोना विषाणू संसर्ग लक्षात घेऊन गावागावांमध्ये ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
संत भगवान बाबांचे जन्मगाव सावरगाव येथे भगवान भक्तीगडावर 2014 पासून पंकजा मुंडे यांच्या मार्फत दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.