बीड – भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज सावरगाव घाट येथील भगवानभक्ती गडावरून दसऱ्यानिमित्त मार्गदर्शन केलं. कोरोनामुळे आजच्या दसरा मेळाव्याला गर्दी नाही, पण गर्दीचे विक्रम मोडणारा दसरा मेळावा घेऊ, एक दिवस आपण शिवजी पार्क मैदानावर दसरा मेळावा भरवणार, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडेंच्या या वाक्यावर उपस्थितांनी जल्लोष करत दाद दिली.
यावर्षी कोरोना महासाथ असल्यामुळे सावरगाव घाट येथील भगवानभक्ती गडावरील दसरा मेळावा ऑनलाईन होणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आज भगवानभक्ती गडावरून फेसबुक लाईव्हद्वारे समर्थकांना मार्गदर्शन केले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, सत्ता असो किंवा नसो, पद असो किंवा नसो पण तुमच्या सर्वांचं प्रेम मला मिळत आहे. यापुढे मंत्रालयाच्या चकरा कमी करून समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचायचं आहे. कोरोनामुळे यावर्षी लोकांची गर्दी कमी आहे, दरवर्षी हजारो लोकांच्या गर्दीत मला भाषण करायची सवय आहे. ही गर्दी मला भगवान बाबांच्या डोळ्यात दिसत आहे. यावर्षी जरी दरवर्षीप्रमाणे दसरा मेळावा झाली नाही, पण आपल्या मेळाव्याची एक वेगळीच शक्ती आहे. पुढच्या वर्षी आपण गर्दीचे रेकाॅर्ड मोडू, एकदा आपल्याला शिवाजी पार्कसुद्धा भरवायचं आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, मुंडे साहेब जिल्हा परिषदेलाही उभे नव्हते. भाजपाचं सरकार येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याकाळी मुंडे साहेबांनी भाजपाचे काम करत राजकीय जीवनाची सुरूवात केली. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये बसलेल्या मुंडेसाहेबांनी म्हटलं होतं, एक दिवस मी या शिवाजी पार्कवर सभा घेईन. म्हणून मी आज सांगते, एक दिवस शिवतिर्थावर दसरा मेळावा घेतल्याशिवाय मी राहणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी सावरगाव घाट येथे जय्यत तयारी करण्यात आली होती. भगवान गडावर जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांचे दर्शन घेतले. भगवानभक्तीगडावर भगवानबाबांच्या 25 फुटी मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर भगवान बाबा स्मृतिस्थळ परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.