नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबात विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार सुरू केला असून, त्यांनी आज तेथील मतदारांना मोफत विजेचे आश्वासन दिले आहे.
आमचे सरकार येथे सत्तेवर आले, तर आम्ही तातडीने या आश्वासनांची पूर्तता करू असे त्यांनी म्हटले आहे. ते उद्या चंदीगड दौऱ्यावर जाणार आहेत, त्याच्या आदल्या दिवशीच त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही दिल्लीत प्रत्येकाला दोनशे युनिट वीज मोफत देतो. त्या निर्णयामुळे येथील महिला खूष आहेत.
पंजाबातील महिला महागाईने चांगल्याच त्रस्त झाल्या आहेत. त्यांना विजेचे बिल देणे परवडेनासे झाले आहे. त्यांना ही मोफत विजेची घोषणा खूप मदत करणारी ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा म्हणाले की, केजरीवाल उद्याच्या पंजाब दौऱ्यात पत्रकार परिषद घेणार होते; पण त्यांना अशी पत्रकार परिषद घेण्यास तेथील सरकारने अनुमती नाकारली आहे. केजरीवालांच्या दौऱ्यामुळे अमरिंदरसिंग यांचे सरकार घाबरले असल्याचा दावाही त्यांनी केला.
तथापि, चंदीगडच्या दौऱ्यात केजरीवाल अनेक महत्त्वाच्या घोषणा करणार आहेत. पंजाबात फेब्रुवारी, मार्चमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच्या तयारीसाठी केजरीवाल उद्या पंजाबचा दौरा करणार आहेत.