केंदूर (पुणे) – गावाने 2018 साली दुष्काळाच्या तीव्र झळा सोसल्या. टॅंकरने पाणी आणि चारा छावण्या गावात सुरू करण्याची वेळ आली होती. त्यातूनच गावातील युवकांनी बोध घेतला आणि ग्रामस्थांची बैठक घेऊन गावाला पाणी मिळवून देण्याचा ध्यास घेतला. थिटेवाडी तलावात पाणी मिळावं यासाठी लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवले. मंत्रालयाच्या वाऱ्या झाल्या मात्र अद्यापपर्यंत हाती काहीच न लागल्याने शेवटी ग्रामस्थांनी एकत्रित येत केंदूर गावचे सुपुत्र आणि पुणे विभागाचे आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पाणीदार करण्यासाठी पाणीदार केंदुर हे अभियान हाती घेतले. त्याचा दुसरा टप्पा नुकताच सुरू झाला आहे. त्याची पाहणी नुकतीच प्रशांत गाडेकर यांनी केली.
दरम्यान सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून एक कोटी रुपये जमा करून पाणीदार केंदूर करण्याचा मानस केला आहे. त्यापैकी गेल्या आठ दिवसांत अकरा लाख रुपये लोकवर्गणीतून जमा झाले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत थिटे यांनी दिली.
दरम्यान पहिल्या टप्प्यात केंदूरच्या पश्चिम भागात पंधरा बंधारे आणि पिंपळखोरीचा तलाव पुनरूजिवित करण्यात आला आहे. त्यामुळे भूजलपातळी वाढली असल्याने परिसरातील शेती हिरवीगार झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात थिटेवाडी येथील तलाव आणि महादेववाडी येथील 1972 साली रोजगार हमीच्या माध्यमातून तयार झालेल्या जाधव तलावचे आणि ओढ्याचे खोलीकरणाचे काम ग्रामस्थांनी हाती घेतले आहे. या तलावाच्या आणि सहा किलोमीटर ओढ्याच्या परिसरातील सहाशे एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती सुमंत पांडे यांनी दिली.
त्यासाठी मानवलोक अंबेजोगाई संस्थेने मशीन उपलब्ध करून दिले आहे. तर त्यासाठी लागणाऱ्या इंधनासाठी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य अविनाश साकोरे, विठ्ठल ताथवडे, मंगल साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वीस युवकांची टीम लोकवर्गणी जमा करत आहेत. या कामाची पाहणी प्रशांत गाडेकर यशदा संस्थेचे सुमंत पांडे, मनरेगाच्या अधिकारी स्नेहल देव शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर, प्रमोद पऱ्हाड, दत्तात्रय वारे यांनी केली तर यावेळी सरपंच सुवर्णा थिटे उपसरपंच भरत साकोरे, कल्पना थिटे, योगिता थिटे, शालन भोसुरे, अलका पऱ्हाड भाऊसाहेब थिटे, युवराज साकोरे,शिवाजी साकोरे, शाहूराज थिटे, अरुण साकोरे, देवा पऱ्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.