शिरूरमधील रामलिंग परिसरात बिबट्या दिसून आल्याने घबराट

शिरूर : देव्हडेवेश्वर रस्ता रामलिंग येथील अभिजीत कर्डिले यांच्या मळ्यात काल रात्री सव्वा नऊ वाजता बिबट्या दिसून आल्याने रामलिंग परिसरात घबराट पसरली आहे. याची माहिती वनविभागाला मिळताच आज सकाळी वन विभागाने अभिजीत कर्डिले यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला आहे.

शिरूर ग्रामीण, रामलिंग, बोराडे मळा, घावटे मळा ,दसगुडे मळा, या परिसरात  अनेक दिवसापासून बिबट्यांचा वावर नव्याने सुरू झाला आहे. काही दिवसापूर्वी बोराडे मळा येथे वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शिरूर शहराच्या पंचक्रोशीत बिबट्याचा वावर असल्याचे जाहीर झाले होते. या अगोदर अनेक वेळा नागरिकांनी बिबट्या पाहिल्याचे बोलले जात होते. परंतु, वनविभाग या भागात बिबट्या नसल्याचे सांगत होते. परंतु बोराडे मळा येथील बिबट्याचा मृत्यू यामुळे येथे बिबट्याचा वावर आहे यावर अखेर शिक्कामोर्तब झाला.

अभिजीत कर्डिले यांची शेती असून त्या ठिकाणी त्यांचा जनावरांचा गोठा  आहे. काल रात्री रामलिंग देवडेश्वर रस्त्यावर अभिजीत कर्डिले, अक्षय जाधव, मंगेश घावटे हे तिघे जण बुलेट गाडीवर या ठिकाणी रात्री सव्वानऊ वाजता जनावरे पाहण्यासाठी गेले असताना त्यांना त्यांच्या गोठ्याच्या  म्हैस बांधलेल्या ठिकाणी परिसरात बिबट्या दिसून आला. बुलेटच्या उजेडात त्यांना साडेतीन -चार फूट उंच असलेला बिबट्या दिसला. बुलेट चा आवाज वाढवल्याने तो झुडपाच्या दिशेने पळत जाऊ लागला. यावेळेस तेथे पडलेल्या काठ्या हातात घेतल्यानंतर झाडीत लपलेला बिबट्या त्यांच्या अंगावर गुरकला परंतु आवाज केल्याने तो पळून गेला असे शेतकरी अभिजित कर्डिले यांनी सांगितले.

यानंतर अभिजीत कर्डिले यांनी त्यांच्या जवळच राहणारे वनकर्मचारी अशोक बोरडे यांना याठिकाणी बिबट्या असल्याचे सांगितले. त्याठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एन. म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक बोरडे , बी एन दहातोंडे, एस एल गायकवाड, संपत पाचुंदकर यांनी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले. यावरून तेथे बिबट्याचा वावर असल्याचेही दिसून आले.

 

आज सकाळी शिरूर रामलिंग ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव जाधव यांनी वनविभागाशी संपर्क साधून याठिकाणी पिंजरा बसवण्याची मागणी केली. वनविभागाचे अधिकारी यांनी  त्यांची मागणी मान्य करून आज लगेच अभिजित कर्डिले यांच्या शेतातील परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.