दहशत माजविण्यासाठी हवेत गोळीबार

भोसरी येथील घटना : दोन आरोपी गजाआड

पिंपरी  – पैसे देण्यास नकार दिल्याने दहशत निर्माण करण्यासाठी पाच सराईत गुन्हेगारांनी भर रस्त्यात हवेत गोळीबार केला. तसेच तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि रोख रक्‍कम हिसकावून नेली. ही घटना भोसरी येथे रविवारी (दि. 11) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील दोन आरोपींना भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना 17 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी (दि. 12) न्यायालयाने दिले.

या प्रकरणी अक्षय अंगत भांडवलकर (वय 21, रा. बाबा लांडगे चाळ, सिद्धेश्‍वर मंदिरामागे, धावडे वस्ती, भोसरी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सनी ऊर्फ सॅंडी गुप्ता, बाबा पांडे, शिवा खरात, विकास जैस्वाल आणि त्याच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी जैस्वाल आणि खरात या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास पाच आरोपी मोटारीतून भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ आले. त्यांनी अक्षय याच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून आरोपींनी पिस्तुलातून गोळीबार करीत दहशत निर्माण केली. त्यानंतर अक्षय याच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, गल्ल्यातील दोन हजार 450 रुपये असा एकूण 62 हजार 450 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सनी गुप्ता, शिवा खरात आणि विकास जैस्वाल या तिघांच्या विरोधात 2018 मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. तर आरोपी बाबा पांडे याच्या विरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच फिर्यादी अक्षय याच्या विरोधातही गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here