आषाढी एकादशी : धामणे गावच्या शेतकऱ्याला मान
मंदिर गाभाऱ्याशिवाय पायरी, सभामंडप फुलले
वडगाव मावळ – आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठलाच्या गाभाऱ्यास तसेच रुख्मिणी मातेच्या मंदिरात मावळ तालुक्यातील धामणे येथील युवा शेतकरी रामनाथ दिलीप गराडे यांच्या शेतातील ऑर्किड या विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्त करण्यात आलेल्या सजावटीसाठी ऑर्किड या विदेशी प्रकारच्या फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. मंदिर गाभाऱ्याशिवाय पायरी, सभामंडप याठिकाणीही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर विदेशी ऑर्किड फुलांची त्यांनी आपल्या पॉलिहाऊसमध्ये शेती केली आहे. काही दिवसांपूर्वी यातील काही फुले पंढरपूर येथील समितीकडे पाठविण्यात आली होती. ही फुले समितीला पसंद पडल्यानंतर ती सजावटीसाठी पंढरपूरला पाठविण्यात आली. आषाढी एकादशीच्या दिवशी केलेल्या फुलांची आकर्षक आरास अधिक प्रसन्न करीत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने सजवलेल्या लाडक्या विठू-रुक्माईचे रूप फुलांच्या सजावटीमुळे अधिकच सुंदर दिसत होते.