विविधा : पंडिता रमाबाई

-माधव विद्वांस

स्त्रियांच्या विशेषतः परित्यक्‍त्या, पतिता व विधवांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या पंडिता रमाबाई यांची आज जयंती.

अंबाबाई आणि अनंतशास्त्री डोंगरे या दांपत्याच्या पोटी 23 एप्रिल 1858 रोजी मंगलोरजवळील माळहेरंजी येथे त्यांचा जन्म झाला. अनंतशास्त्री हे पुरोगामी विचाराचे विद्वान पंडित होते. स्त्रीशिक्षणाचे ते पुरस्कर्ते होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले. त्यांचे वडील त्यांना घेऊन कुटुंबासह तीर्थाटन करीत होते. या काळातच रमाबाईंना आई-वडिलांपासून, विशेषतः आईकडून संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले. दुर्दैवाने वर्ष 1877 मधे त्यांचे मातृपितृ छत्र हरविले.

1878 साली त्यांचे बंधू श्रीनिवासशास्त्री यांच्यासह प्रवास करीत त्या कलकत्त्याला आल्या. रमाबाईंनी संस्कृत बरोबरच मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड भाषांवरही प्रभुत्व मिळविले होते. कलकत्ता येथे मात्र त्यांच्या विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा उचित गौरव झाला. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना “पंडिता’ व “सरस्वती’ ह्या बिरुदावली बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

बंगाली स्त्रियांनीही त्यांना “भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण’ म्हणून मानपत्र दिले. योळी त्यांच्या बंधूंचा मृत्यू झाला व त्या एकट्या पडल्या. त्याच दरम्यान बिपिन बिहारीदास मेधावी पुरोगामी विचारांच्या वकिलाने त्यांना लग्नाची मागणी घातली. मागणी घातल्यानंतर त्यांच्याशी त्यांनी विवाह केला. बिपिन शूद्र जातीतील असल्याने या विवाहाने मोठे वादळ उठले. पुढे त्यांच्या पतीचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर त्या 31 मे 1882 रोजी आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हीला घेऊन पुण्यास येऊन राहिल्या.

सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर वर्ष 1883 मधे त्यांनी प्रभावी साक्ष दिली. स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह मे 1883 मध्ये इंग्लंडला गेल्या. स्त्रीधर्मनीति ह्या पुस्तकाच्या विक्रीतून हा प्रवासखर्च त्यांनी केला. इंग्लंडमध्ये त्या वॉंटिज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. याच वेळी त्या येशू ख्रिस्ताच्या विचारांनी भारावल्या व त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान समारंभास हजर राहता यावे म्हणून त्या फेब्रुवारी 1886 मध्ये अमेरिकेस गेल्या.

हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्‍त होणारी “बालोद्यान शिक्षणपद्धती’ त्यांनी शिकून घेतली व त्यासंबंधी मराठी पुस्तके लिहिली. अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात हिंदू बालविधवांच्या प्रश्‍नांचा ऊहापोह करणारे “द हाय कास्ट हिंदू वूमन’ हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले. त्यांनी तेथील मुक्‍कामात “यूनायटेड स्टेट्‌सची लोकस्थिती’ व “प्रवासवृत्त’ ही पुस्तके प्रसिद्ध केली. हिंदुस्थानातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी अमेरिकनांनी बोस्टन येथे “रमाबाई असोसिएशन’ व इतरही काही संस्था निर्माण केल्या.

अमेरिकेहून परत आल्यानंतर मुंबईला विधवांकरिता “शारदा सदन’ नावाची संस्था त्यांनी काढली. त्यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाकरिता स्त्रीप्रतिनिधित्वाचा पुरस्कार केला. केशवपनाविरुद्ध त्यांनी प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीस पाठिंबाही दिला. 1890 च्या नोव्हेंबर महिन्यात “शारदा सदन’ पुण्यात आणण्यात आले. शारदा सदनमध्ये प्रत्येक मुलीला धर्माचे स्वतंत्र दिले होते. तरीही गैरसमजातून झालेल्या विरोधामुळे त्यांना आपल्या कार्याचे मुख्य केंद्र केडगाव (जि. पुणे) येथे न्यावे लागले.

महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साड्यांचा वापर त्यांच्यामुळेच सुरू झाला.24 सप्टेंबर 1898 रोजी केडगावला “मुक्‍तिसदना’चे उद्‌घाटन करण्यात आले. रमाबाईंचे व्यक्‍तिगत जीवन मात्र फार दुःखी होते. शेवटच्या काळात त्यांची मुलगी मनोरमा ही मिरज येथे 24 जुलै 1921 रोजी वारली व त्यानंतर वर्षभरातच 5 एप्रिल 1922 रोजी केडगाव येथे रमाबाईंचेही निधन झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.